नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सीताबर्डी येथील ग्लोकल मॉल मधील विभागीय कार्यालयाचे आज गुरुवार 14 डिसेंबर 2023 रोजी भारतीय जनता पार्टीचे नागपूर महानगर अध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
याप्रसंगी क्रीडा क्षेत्रातील मानाचे दादोजी कोंडदेव पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, छत्रपती पुरस्कार असे चारही पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर, सहा वेळ विदर्भ केसरीचा खिताब पटकाविणारे विदर्भ कुश्ती असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय तिरतकर, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव राकेश तिवारी, माजी क्रीडा सहसंचालक जयप्रकाश दुबळे, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, सुधीर दिवे, महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर उपस्थित होते.
नागपूर शहरासह विदर्भातील खेळाडूंच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सवाला लवकरच सुरूवात होणार आहे. खेळाडूंना नोंदणी तसेच अन्य महत्वाची माहिती मिळविण्यासाठी खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यालयाची मोठी मदत होते. या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित समारंभात भारतीय जनता पार्टीचे नागपूर महानगर अध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी खासदार क्रीडा महोत्सव हा खेळातून ध्येयाकडे प्रेरीत करणारा महोत्सव असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे खेळाकडून ध्येयाकडे वाटचाल आणि त्यातून हिंदवी स्वराज्याची संकल्पना पूर्णत्वास नेली. तोच आदर्श पुढे नेत केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी देशातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आयोजित करून तरुणांना ध्येयाकडे वाटचाल करण्यास प्रेरित केल्याचे ते म्हणाले.
खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी याप्रसंगी महोत्सवाच्या मागील पाच वर्षातील वाटचालीत झालेल्या बदलांची माहिती दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून 2018 साली पहिल्यांदा खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात फारशी माहिती नसतानाही यशस्वीरीत्या तो पार पडला. पण पुढील काळात महोत्सवाचे आयोजन करताना जुन्या अनुभवातून शिकत नवनवे बदल करता आले. विविध खेळांचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 2018 चा पहिला खासदार क्रीडा महोत्सव 20 दिवसांचा होता. यात 30 क्रीडांगणांवर 20 खेळ, 292 स्पर्धा, 540 चमू, 880 प्रशिक्षक, 1500 ऑफिशियल्स आणि 25 हजार खेळाडूंचा समावेश होता. या क्रीडा महोत्सवात 43 लक्ष 80 हजार 200 रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. तर मागील वर्षी 2022 साली झालेल्या पाचव्या खासदार महोत्सवात 15 दिवसांत 49 क्रीडांगणांवर 35 खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यात 2280 चमूंनी सहभाग घेतला. 5000 ऑफिशियल्स आणि 54 हजार खेळाडूंचा सहभाग होता. महोत्सवात 1 कोटी 30 लक्ष 87 हजार रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची माहिती श्री संदीप जोशी यांनी दिली.
मागील पाच वर्षांचा महोत्सवाच्या प्रवासाचा आढावा घेता महोत्सवाला प्राप्त होत असलेले भव्य स्वरूप आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात पुढे अधिक भव्यदिव्य होईल, असा विश्वास देखील संदीप जोशी यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संचालन महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर यांनी केले व आभार डॉ. पद्माकर चारमोडे यांनी मानले.यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे कोषाध्यक्ष आशिष मुकीम, सदस्य नागेश सहारे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. विवेक अवसरे, सचिन देशमुख, अशफाक शेख, अमित संपत, सतिश वडे, सचिन माथने, सुनील मानेकर, लक्ष्मीकांत किरपाने, डॉ. सौरभ मोहोड, रमेश भंडारी, प्रकाश चांद्रायण आदी उपास्थित होते.