नागपूर :- नवीन वीजजोड घेण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना अवघ्या 24 ते 48 तासांमध्ये वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी ‘महावितरण’कडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.. या मोहीमेत आजपावेतो नागपूर परिमंडलांतर्गत असलेल्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील तब्बल 906 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना एक ते दोन दिवसांत नवीन मोहीम वीजजोड देण्यात आले. यात 274 ग्राहकांना 24 तासात तर 532 ग्राहकांना 48 तासात नवीन वीजजोड देऊन ‘महावितरण’ने त्यांचे आयुष्य प्रकाशमान केले.
‘महावितरण’कडून ‘इज ऑफ लिव्हिंग’ अंतर्गत नागपूर परिमंडलात नवीन वीज जोडणीसाठी आवश्यक पायाभुत सुविधा उपलब्ध असलेल्या भागात मागेल त्यास ताबडतोब नवीन वीजजोड देण्यात येत आहे. शक्य असल्यास विलंब न करता शहरी आणि ग्रामीण भागांत 24 ते 48 तासांत नवीन वीजजोड कार्यान्वित होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात महावितरण नागपूरचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात नागपूर परिमंडलात ‘इज ऑफ लिव्हींग’ या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना तातडीने सेवा दिल्या जात आहेत. संचालक (संचालन) संजय ताकसांडे हे वीजमीटरची उपलब्धता आणि नवीन जोडण्या कार्यान्वित करण्याच्या मोहिमेचा नियमित आढावा घेत आहेत. अस्तित्वात असलेल्या वीजयंत्रणेमधून वीजभाराच्या मागणीसह जोडणी देणे शक्य आहे, अशा ठिकाणी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि रकमेचा भरणा केल्यास 24 ते 48 तासांत नवीन जोडणी कार्यान्वित करण्यात येत आहे.
1 जानेवारीपासून 58 हजारावर नवीन जोडण्या
अर्जदारांना तातडीने नवीन वीजजोड देण्याच्या मोहिमेस ‘महावितरण’ ने गती दिली आहे. नागपूर परिमंडलात यंदा जानेवारी ते 28 ऑगस्टपर्यंतच्या काळात 58 हजार 275 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यात नागपूर शहर मंडलात 30 हजार 534, नागपूर ग्रामीण मंडलात 16 हजार 807 तर वर्धा मंडलातील 10 हजार 934 वीज जोडण्यांचा समावेश आहे. यापैकी केवळ ऑगस्ट महिन्यात 6 हजार 910 नवीन वीज जोडण्यांचा समावेश असून त्यापैकी नागपूर शहर मंडलात 3 हजार 833, नागपूर ग्रामीण मंडलात 2 हजार 16 तर वर्धा मंडलातील 1 हजार 61 वीज जोडण्यांचा समावेश आहे. ‘महावितरणच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ चा लाभ घेत ग्राहकांनी देखील त्यांच्या वीज बिलांचा ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमाने नियमित करुन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.