धनादेशाने वीज देयकाचा भरणा करतांना काळजी घ्या

नागपूर :- महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी राज्यभरात दरमहा हजारो धनादेश अनादरीत (चेक बाऊंस) होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक वीजबिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह 885/- रुपयांचा दंड पुढील महिन्याच्या वीजबिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे.

‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध असली तरी अद्यापही अनेक वीजग्राहक दरमहा वीजबिलांचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेत. धनादेश अनादरीत झालेल्या सर्व ग्राहकांना प्रत्येक वीजबिलासाठी 750/- रुपये बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस व त्यावरील 18 टक्के जीएसटी कराचे 135/- रुपये असे एकूण 885/- रुपये आणि विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे.

अनादरित झालेल्या एकाच धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी दंडात्मक रक्कम लावण्यात येत आहे. यासोबतच धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येत आहे. धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात संबंधीत रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश अनादरित होत असल्याचे आढळून येत आहे. धनादेश दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. धनादेश दिल्यानंतर वीजबिल भरल्याची पावती त्याच दिवशी मिळत असली तरी धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच वीजबिल भरणा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे मुदतीच्या एक-दोन दिवस आधी दिलेल्या धनादेशाची रक्कम मुदतीनंतर जमा झाल्याने पुढील वीजबिलामध्ये थकबाकी दिसून येते. त्यामुळे ग्राहकाने देय तारखेपूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या तीन दिवस अगोदर धनादेश देणे आवश्यक आहे.

धनादेशाव्दारे वीज बिलाचा भरणा करतेवेळी धनादेश अकाउंट पेयी आणि ‘MSEDCL’ च्या नावे असावा, धनादेश स्थानिक बँकेचा असावा, धनादेशासोबत पावती स्थळप्रत जोडावी, स्टॅपल करू नये. याशिवाय धनादेश पुढील तारखेचा नसावा. धनादेश/ डीडी ने देयकाचा भरणा केल्यास, महावितरणच्या खात्यात रक्कम जमा होण्याची दिनांक, भरणा दिनांक म्हणून गृहित धरल्या जाते. देयक चेक कलेक्शन पेटीत टाकतांना धनादेशाच्या मागे ग्राहक क्रमांक (पी.सी., बि. यु. साहित) लिहावा व स्थळप्रतीच्या मागे चेकचा तपशील लिहावा. परक्राम्य संलेख अधिनियम (Negotiable Instrument Act) 1881 कलम 138 प्रमाणे धनादेश अनादरीत होणे हा दंडनीय अपराध असून कायदेशीर कारवाईस पात्र आहे. धनादेश ही ग्राहकाने वापरलेली सुविधा आहे त्यामुळे कुठल्याही कारणास्तव त्याचा अनदार झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही ग्राहकाची असल्याचेही महावितरणतर्फ़े स्पष्ट करण्यात आले आहे.

महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच महावितरण मोबाईल अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ‘ऑनलाईन’ भरणा करणे लघुदाब वीजग्राहकांसाठी घरबसल्या शक्य झाले आहे. एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबत सेवा उपलब्ध आहे. तसेच डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे भरणा केल्यास वीजबिलामध्ये 0.25 टक्के (500 रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. तर क्रेडीट कार्ड वगळता सर्व ‘ऑनलाईन’द्वारे होणारा भरणा निशुल्क आहे. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती किंवा सोसायट्यांच्या वीजग्राहकांचे बिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे. वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी ‘ऑनलाईन’द्वारे वीजबिलांचा भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, नागपूर

NewsToday24x7

Next Post

राज्याच्या पहिल्या मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदी राम नाईक

Fri Aug 25 , 2023
मुंबई :- भूजलाशयीन आणि सागरी जिल्ह्यांत मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत आता अंशतः बदल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच मत्स्य व्यवसाय विकास धोरण होत असून मत्स्य व्यवसायाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने ते साह्यभूत ठरणार आहे. या समितीत सागरी जिल्ह्यांतील तसेच भूजलाशयीन […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com