– 7.26 कोटींचा वीजचो-या उघड; 149 वीजचोरांविरोधात गुन्हे दाखल
नागपूर :- वीजचोरीविरोधात कठोर भुमिका घेत महावितरणच्या नागपूर परिमंडलाने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये तब्बल 4 हजार 50 वीजचो-या उघडकीस आणल्या. यात बेकायदेशीर वीज वापर, वाढिव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची 334, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची 2024 तर वीज मीटर मध्ये फ़ेरफ़ार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या 1692 प्रकरणांचा समावेश आहे. या सर्व प्रकारातून झालेल्या वीजचोरीचे मुल्य तब्बल 7 कोटी 26 लाख 44 हजार असून या सर्व प्रकरणांत 149 वीजचोरांविरोधात भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
2023-24 या आर्थिक वर्षात मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत असलेल्या नागपूर शहर, नागपूर ग्रामिण आणि वर्धा मंडलात वीजचोरी विरोधात आक्रमक भूमिका घेत सातत्याने ठिकठिकाणी वीजचोरी विरोधात मोहीम राबविण्यात आली. यात नागपूर शहर मंडलात बेकायदेशीर वीज वापर, वाढिव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची 263, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची 1331 तर वीज मीटर मध्ये फ़ेरफ़ार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या 789 प्रकरणांचा समावेश असून या वीजचोरीचे रक्कम तब्बल 4 कोटी 46 लाख 21 हजार इतकी आहे. यापैकी 1593 ग्राहकांवर तडजोडीपोटी 52 लाख 92 हजारांचा दंड आकारण्यात आला असून 146 वीजचोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तर नागपूर नागपूर मंडलात बेकायदेशीर वीज वापर, वाढिव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची 22, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची 526 तर वीज मीटर मध्ये फ़ेरफ़ार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या 371 प्रकरणांचा समावेश असून या वीजचोरीचे रक्कम तब्बल 1 कोटी 54 हजार इतकी आहे. यापैकी 607 ग्राहकांवर तडजोडीपोटी 14 लाख 83 हजारांचा दंड आकारण्यात आला आले.
नागपूर पाठोपाठ महावितरणने वर्धा जिल्ह्यात देखील वीजचोरांविरोधात कारवाईचा धडाका कायम ठेवीत वर्षभरात बेकायदेशीर वीज वापर, वाढिव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची 49, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची 147 तर वीज मीटर मध्ये फ़ेरफ़ार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरी 532 प्रकरणे उघडकीस आणली. या वीजचोरीचे रक्कम तब्बल 1 कोटी 79 लाख 68 हजार इतकी आहे. यापैकी 498 ग्राहकांवर तडजोडीपोटी 19 लाख 46 हजाराचा दंड आकारण्यात आला.
चालू आर्थिक वर्षात देखिल वीजचोरीविरोधातील महावितरणतर्फ़े अधिक आक्रमकपणे कारवाई सुरु राहणार असून ग्राहकांनी वीजेचा अधिकृत वापर करुन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आलेआहे.
– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर