संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यात तहसील कार्यालय ,नगर परिषद ,पंचायत समिती,पोलीस स्टेशन यासारखे विविध शासकीय कार्यालय असून या कार्यालयात महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे .मात्र या सर्व शासकीय संस्थांमध्ये हिरकणी कक्ष दिसुन येत नसल्याने कामठी तालुक्यात हिरकणी कक्षाचे अस्तित्व नगण्यच असल्याचे दिसून येते.
कामठी तालुक्यातील या सर्व शासकीय संस्थेत हिरकणी कक्ष नसल्याने महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.तसेच स्वायत्त संस्थेत सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला जनप्रतिनिधीना देखील या असुविधेचा सामना करावा लागत आहे.तसेच या स्वायत्त संस्थेत काही कामासाठी आलेल्या नवप्रसूत महिलांना आपल्या दुधपित्या बाळांना स्तनपान करण्यासाठी उघड्यावरच स्तनपान करावे लागते तसेच आपल्या वार्ड व प्रभागाचे कार्यभार सांभाळणाऱ्या लोकप्रतिनिधी तसेच स्वायत्त संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मुलं लहान असले की या लहान मुलांना सोबतच न्यावे लागते अशा महिला सदस्यांसाठी आणि त्यांच्या लहान बाळासाठी हिरकणी कक्षाची स्थापना होणे गरजेचे आहे.मात्र तालुक्यातील ठिकाणी हिरकणी कक्ष नसल्याची एक मोठी शोकांतिका आहे .येथील महिला लोकप्रतिनिधी तसेच शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी हिरकणी कक्ष असणे नितांत गरजेचे आहे तेव्हा संबंधित प्रशासनाने कार्यालय स्तरावर हिरकणी कक्षाची स्थापना करावी अशी मागणी जोर धरत आहे.