– इंदूरच्या महापौरांनी घेतली आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांची सदिच्छा भेट
नागपूर :- स्वच्छतेसाठी इंदूर शहर हे देशपातळीवर ओळखल्या जाते. मात्र, आज नागपूर नगरीची स्वच्छता बघून प्रभावित झालो असे प्रतिपादन इंदूर नगर निगमचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी केले. इंदोर नगर निगमचे महापौर पुष्यमित्र भार्गव हे गुरुवारी (24) नागपूर शहरात आले असता त्यांनी नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांची सदिच्छा भेट घेतली. नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकिय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात ही भेट झाली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी महापौर पुष्यमित्र भार्गव यांचे मनपाचा मानाचा दुपट्टा व सन्मानचिन्ह देत स्वागत केले. तसेच महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी देखील मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना मानाचा दुपट्टा प्रदान केला.
यावेळी महापौर पुष्यमित्र भार्गव म्हणाले की, नागपूर शहर हे देशातील महत्वाच्या शहरांपैकी एक आहे, आज नागपूर नगरीत आल्यावर येथील स्वच्छता बघून प्रभावित झालो. स्वच्छतेसाठी इंदूर शहराचे नाव आहे असे असतांना नागपूरही स्वच्छतेच्या दृष्टीने कुठेही मागे नाही, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई-लायब्ररी सारख्या उपक्रमांचे अनुकरण देश पातळीवर व्हायला हवे असे म्हणत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
तत्पूर्वी नागपूरनगरीत आलेले इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी नागपूर महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई-लायब्ररी, कविवर्य सुरेश भट सभागृह आणि स्व. गोपालराव रामजी मोटघरे हिंदी उच्च प्राथमिक शाळा भेट दिली. याप्रसंगी माजी महापौर दयाशंकर तिवारी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, उपायुक्त रवींद्र भेलावे, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, आकांक्षा फाउंडेशनचे सोमसूर्व चॅटर्जी यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
सदिच्छा भेटी दरम्यान पुष्यमित्र भार्गव यांनी मनपा मुख्यालयात शहरातील ऑरेंज सिटी स्ट्रीट सह विविध विकास कामांची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, उप अभियंता राजीव गौतम प्रामुख्याने उपस्थित होते.