नवी दिल्ली :- खाण मंत्रालय तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय क्षयरोग विभाग यांच्यात क्षयरोग निर्मूलनासाठी सहयोगी आणि एकत्रित कृतीसाठी आज नवी दिल्ली येथे सामंजस्य करार झाला.
या सामंजस्य करारावर खाण मंत्रालयाच्या सहसचिव डॉ. फरीदा एम. नाईक, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार डॉ. के.के. त्रिपाठी यांनी दोन्ही मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या केल्या. सर्व केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (सीपीएसइ) आणि खाण मंत्रालयाशी संलग्न/अधिन्य कार्यालयांचे अधिकारी यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. सन 2025 पर्यंत भारतातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे (टीबी) लक्ष्य साध्य करण्यासाठी आंतर-मंत्रालयीय सहयोग आणि धोरणात्मक भागीदारी तयार करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.
या भागीदारीचा उद्देश सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, संलग्न कार्यालये, अधीनस्थ कार्यालये आणि खाण मंत्रालयाच्या स्वायत्त संस्थांच्या सहकार्याने राष्ट्रीय क्षय निर्मूलन कार्यक्रमांतर्गत वेबिनार आणि इतर जागरूकता उपक्रम राबवणे आहे. तळागाळात क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी सार्वजनिक क्षेत्र उपक्रम रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विशेष मोहिमांसाठी आरोग्य कार्याधिकारींची कार्यक्षमता वाढविण्यासाठी हा उपक्रम मदत करेल.