शुक्रवारी 39880 घरांचे सर्वेक्षण
नागपूर : राज्यात काही भागात गोवर (मीझल्स) ची साथ पसरत असल्याने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गोवर संसर्गापासून सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील बालकांच्या प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभिनयासाठी ९३० पेक्षा अधिक आशा वर्कर्स दहाही झोन निहाय घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. त्यानुसार शुक्रवारी (ता.२५) 39880 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
गोवर हा प्रामुख्याने लहान मुलामध्ये आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. गोवरचे उच्चाटन करण्यासाठी मनपाद्वारे शहरातील 5 वर्षाखालील लहान बालकांचे गोवर डोज सुटले असल्यास किंवा काही कारणामुळे दिले गेले नसल्यास लसीकरण केले जात आहे. गोवरचा संसर्ग वाढत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर शहरात बालकांच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती मनपाचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी दिली आहे.
मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार यांनी सांगितले की, गोवरचे लसीकरण करुन आपल्या बाळांना गोवर आणि रुबेलाच्या संभावित धोक्यापासून दूर ठेवण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले होते. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या सर्व ४५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर गोवर आणि रुबेलाची लस ५ वर्षापर्यंतच्या बालकांना नि:शुल्क दिली जात आहे. तसेच मनपाच्या दहाही झोननिहाय घरोघरी जाऊन लसीकरण व “अ” जीवनसत्वचा डोस दिला जात आहे. लसीकरण अभियानासाठी ९३० हुन अधिक आशा वर्कर्स घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत असून २५० हुन अधिक एएनएम कार्यरत आहेत. हे कर्मचारी झोपडपट्टी, बांधकाम ठिकाणे, बेघर वस्ती आदी ठिकाणी जाऊन संशयीत रुग्णांची माहिती प्राप्त करण्यासाठी घरो-घरी भेट देत आहेत. लसीकरण कमी असणाऱ्या क्षेत्रामध्ये प्राथमिक तत्त्वावर हे सर्वेक्षण आणि लसीकरण केले जात आहे. त्यानुसार शुक्रवारी 39880 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यातील 597 बालकांना गोवर रुबेलाचा पहिला तर 490 बालकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 1270 बालकांना “अ” जीवनसत्व चा डोस देण्यात आला आहे.
गोवरपासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी काही भागात केवळ चुकीची माहिती पसरवून संभ्रम निर्माण केला जातो व लसीकरणाला विरोध होत असल्याचे दिसून येते. ही चुकीची बाब असून बालकांच्या लसीकरणासाठी शहरातील सर्व समुदायाचे व्यक्ती, धर्मगुरू, जनप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व सर्व नागरिकांनी मनपाला सहकार्य करावे, तसेच कोणत्याही बालकाला गोवर झाल्यास घरगुती उपचार करण्यात वेळ न घालवता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.
गोवरची लक्षणे
ताप, सर्दी, डोळे लाल होणे, खोकला अशी सुरूवातीची लक्षणे असतात. त्यानंतर पुरळ उठायला सुरवात होते, ती कपाळा पासून व नंतर मान व हातपाय पर्यंत पसरते. गोवर हा गंभीर आजार आहे कारण हा इतर आजारांना निमंत्रण देतो. लहान मुलांना खोकल्याचा त्रास सुरु होतो व त्यामुळे घशाला सूज येते निमोनिया होऊ शकतो. गोवर झाल्यानंतर अ जीवनसत्व कमी होते त्यामुळे डोळ्याचे आजार होतात काही वेळा अंधत्व पण येते. कुपोषित बालकास हा आजार होण्याची जास्त शक्यता असते
काळजी घ्या हे करू नका
गोवर झाल्यास बालकाला इतरांपासून वेगळे ठेवले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी जाऊ देणे टाळा, बालकांना शाळेत पाठवू नये. कारण हा आजार अतिशय संसर्गजन्य आहे. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ल्या घ्यावा , घरच्या घरी उपचार करू नये, कडू निंबाचा पाला किंवा इतर कोणतेही घरगुती उपचारात वेळ घालवू नये. सर्व डॉक्टरांनी गोवर सदृश लक्षणे असणाऱ्या सर्व बालकाची माहिती महानरपालिका आरोग्य विभागास देणे आवश्यक आहे.