अमरावती :- तुम्हाला सर्वात आळशी माणूस पहायचा असेल तर तुम्ही मातोश्रीवर जाऊ शकता, असा सल्ला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या एका वक्तव्यानंतर नवनीत राणांनी हे प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर सुषमा अंधारे यांनी टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणांनी त्यांना सर्वात आळशी माणूस पहायला तुम्ही मातोश्रीवर जाऊ शकता, या जहरी शब्दात टीका केली.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नवनीत राणा यांनी वारंवार तीव्र शब्दात टीका केली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना सर्वात आळशी माणूस असं संबोधलंय.
अमरावतीत टीव्ही9 शी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, ‘ मी त्यांना (सुषमा अंधारेंना) ओळखत नाही. ती महिला अक्टिंग करते. ज्या पद्धतीने त्या बोलतात, त्यांनी काल उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली, ती चुकीची आहे.
त्यांना जर आळशी माणूस शोधायचा तर त्यांनी मातोश्रीवर जावं. आडशी माणूस, आडशी व्यक्ती ऑफ द इयर आणि पाच वर्षांतला आडशी माणूस शोधायचा असेल तर त्यांच्याच पार्टीचा अध्यक्ष आहे त्यांना जाऊन ते शोधू शकतात, असा सल्ला नवनीत राणा यांनी दिला.
उद्धव ठाकरे त्यांच्या आयुष्यात 56 वर्षात जेवढे फिरले नसतील तेवढे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री गेल्या तीन महिन्यात फिरले आहेत. त्यामुळे आळशी माणूस त्यांना शोधायचा असेल तर त्यांना मातोश्रीच्या साइडला जावं..
नवनीत राणा आज दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. मतदार संघाच्या कामासाठी मी जाणार असल्याची माहिती नवनीत राणा यांनी दिली.