हिंमत असेल तर काँग्रेसच्या जाहीरनाम्याला पाठिंबा जाहीर करा! – रत्नागिरी येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

रत्नागिरी :- हिंमत असेल तर अयोध्येत राम मंदिर बांधले गेले ही चांगली गोष्ट झाल्याची जाहीर कबुली द्या, असे आव्हान देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी रत्नागिरी येथे झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत नकली सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे दाखवू शकत नसतील, तर नकली शिवसेनादेखील त्यांनी चालवू नये, असा टोलाही शाह यांनी लगावला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत ,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आ.नितेश राणे, आ.शेखर निकम, किरण सामंत, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आदी यावेळी उपस्थित होते.

शाह म्हणाले की, तिहेरी तलाक, कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्याशी सहमत आहात का, हेही उद्धव ठाकरेंनी जाहीर करावे. काँग्रेसची वोट बँक हीच उद्धव ठाकरेंची वोट बँक आहे हे माहीत असल्याने अशी कबुली देण्याची हिंमत ते दाखविणार नाहीत. तिहेरी तलाक पुन्हा लागू करण्याचे आश्वासन देणाऱ्या, 370 कलम पुन्हा लागू करण्याची ग्वाही देणाऱ्या, मुस्लिम पर्सनल पुन्हा लॉ लागू करण्याचे आश्वासन देणारा काँग्रेसचा जाहीरनामा मान्य आहे की नाही, हे जाहीर करा, मौन पाळू नका, महाराष्ट्राच्या जनतेसमोर याची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागतील. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा असा सहज मिळत नसतो, तुम्ही केवळ त्यांच्या पोटी जन्म घेतला, पण वारसा मात्र नारायण राणे, एकनाथ शिंदे, राज ठाकरे चालवत आहेत. तुम्ही त्या वारशाचा केव्हाच त्याग केलात, अशा शब्दांत शाह उद्धव ठाकरे यांच्यावर अक्षरशः बरसले. इंडी आघाडी ही एक प्रकारे औरंगजेब फॅन क्लब झाली आहे, त्यामुळे या फॅन क्लबसोबत जायचे, की मोदीसोबत राहायचे याचा निर्णय रत्नागिरीकरांनी करायला हवा, असे आवाहनही शाह यांनी केले.

नारायण राणे यांच्यासाठी दिलेले एक-एक मत मोदीना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविणारे व देशाला समृद्ध करणारे ठरणार आहे. देशाची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर सोडून काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहन सिंग पायउतार झाले. मोदीनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. मोदीना प्रधानमंत्री बनविणे म्हणजे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणणे, देशाच्या सुरक्षिततेची हमी मिळविणे आहे. मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणणार ही मोदीची गॅरंटी आहे, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

उद्धव ठाकरे ज्यांच्या बरोबर जाऊन बसले आहेत, त्या सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी 70 वर्षांपासून अनाथ अपत्यासारखे 370 कलमास कवटाळले होते. 370 कलम रद्द केल्यास काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील असे राहुल गांधी म्हणाले होते. पाच वर्षे झाली. काश्मीरमध्ये रक्ताचा एक थेंबही सांडलेला नाही. मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ज्यांच्या पायाशी लोळण घेतली ते काँग्रेस व शरद पवार कलम 370 रद्द करण्यास विरोध करत होते. तुम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे की, कलम 370 ची पाठराखण करणारी काँग्रेस व शरद पवारांची एनसीपी पाहिजे याचे उत्तर नकली सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिले पाहिजे, असेही शाह म्हणाले. जे शरद पवार आणि राहुल गांधींसमोर लोटांगण घालतात, ते महाराष्ट्राचा सन्मान सांभाळू शकत नाहीत, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

सोनिया-मनमोहन सरकारच्या काळात पाकिस्तानातून दहशतवादी येऊन बॉम्बस्फोट करून जात होते, तेव्हा काँग्रेसची वोट बँक सांभाळण्यासाठी मौनीबाबा मनमोहन सिंग दिल्लीत मौन धारण करून बसत होते. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यावर दहा दिवसांतच मोदीजींनी पाकिस्तानात घुसून आतंकवादाचा नायनाट केला. छत्तीसगढमध्ये नक्षल्यांचा सफाया झाला, 29 नक्षलवादी ठार झाले, तेव्हा राहुल गांधी त्यांच्या बचावासाठी पुढे आले. ज्यांनी शेकडो निरपराधांचा जीव घेतला, त्यांचा बचाव करणाऱ्या राहुल गांधींसमोर उद्धव ठाकरे लोटांगण घालतात, ही शरमेची बाब आहे, असेही ते म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Enigma Miss & Mrs India 2024 : A Spectacular Showcase of Beauty, Talent, and Glamour in Mumbai..

Sat May 4 , 2024
Nagpur – Enigma Event Management Co. has successfully completed the 5th edition of Enigma Miss & Mrs India at Hotel Ginger in Mumbai on 28th April. The event was hosted and managed by Mr. Deepak Chaturvedi, Director of Enigma Event Management Co., with celebrity guests Samaira Sandhu, Devyanshi Dev, Nidhi Mathur, Arvinder Singh, Ajit Pandit, and Keshav Anand in attendance. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com