-बॅटरी कार अन् ट्राली बॅगने कुलींचे जीवन संकटात
नागपुर :- कुली या चित्रपटाने प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या कुलींसमोर जगण्याचा आणि कुटुंबाला जगविण्याचा प्रश्न भेडसावित आहेत. पोट भरणेच कठीन झाले तर मुलांना शिकविणार कसे? असा प्रश्न कुलींंसमोर आहे. तंत्रज्ञानाने प्रगती तर केली मात्र, कुलींच्या हातातील रोजगार हिरावला.
रेल्वेची धडधड. प्रवाशांची वर्दळ आणि कुलींची धावपळ, असे दृष्य रेल्वे स्थानकावर असते. रेल्वे म्हणजे अद्भूत विश्वच. रेल्वेच्या या विश्वात अनेक जन रममाण होतात. रेल्वेचे विश्व, कुलींची कार्यपध्दती आणि रेल्वेच्या आगळ्या वेगळ्या विश्वाच्या आकर्षनामुळे चित्रपट सृष्टीला त्यावर चित्रपट तयार करावे लागले.
चाळीस वर्षापूर्वी (1983) कुली या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांनी कुलीची भूमिका साकारली. यासोबतच सारी दुनिया का बोझ हम उठाते है. या गिताने देशभरातील कुली प्रसिध्दीच्या झोतात आले. या चित्रपटातील दृष्याप्रमाणे नागपूर रेल्वे स्थानकावरील कुलींचे जीवन आहे. चित्रपटात ज्येष्ठ कुली तसेच मार्गदर्शन करणारे दृष्य साकारण्यात आले. अगदीच तेच चित्र नागपूर स्थानकावर आहे.
दहा वर्षापूर्वी कुलींची डिमांड होती. आज तंत्रज्ञानाच्या युगात बॅग एैवजी ट्राली बॅग (चाकांची) आल्याने प्रवाशांना प्लॅटफार्म पर्यंत घेवून जाने सोयीचे होते. त्यामुळे कुलींना फारसे कोणी विचारत नाही. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाच्या मदतीने ज्येष्ठ नागरिक आणि आजारी लोकांच्या सुविधेसाठी बॅटरी कारची व्यवस्था केली. मात्र, काही प्रवासी बॅटरीकारने ओझेही घेवून जातात. त्यामुळे कुलींचा व्यवसाय हिरावल्या गेला.
प्रवाशांसाठी 145 कुली
नागपूर रेल्वे स्थानकावर तब्बल 145 कुली आहेत. यात 21 वर्षांपासून ते 80 वयाच्या कुलींचा समावेश आहे. दोन शिफ्टमध्ये कुलींचे काम चालते. यातील पाच दहा कुली अजनी रेल्वे स्थानकावर तर काही नागपूर स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम विभाग वाटून घेतात.
कुली ऐवजी रेल सहायक
कुली हा रेल्वेचा अंग आहे. कुली रेल्वेची ओळख आहे. तंत्रज्ञानामुळे कुली बांधवांच्या हाताला काम उरले नाही. एका शिफ्टमध्ये एकाच प्रवाशाचे ओझे उचलण्याचे काम मिळते. त्यामुळे जगणे आणि कुटुंबाला जगविणे हाच एक विचार असतो. मुलांना शिक्षण देणे कठीण आहे. अलिकडेच कुली हे नाव बदलून त्या एैवजी रेल सहायक हे नाव देण्यात आले. आमची ओळख कुली याच नावाने आहे.
अब्दुल मजिद, अध्यक्ष, सेंट्रल रेल्वे भार वाहक संघटना