– 10 फॉगिंग वाहनांवर जीपीएस ट्रॅकर : आतापर्यंत 2,42,159 घरांचे सर्वेक्षण
नागपूर :- नागपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढत प्रसार रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे वेगवेगळ्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. आरोग्य विभागाने ‘फॉगिंग’ आणि ‘स्प्रेईंग’ करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या 50 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच 10 फॉगिंग गाडीवर जीपीएस ट्रॅकर लावण्यात आले आहेत. सकाळी आणि संध्याकाळी फॉगिंग होणार असून त्यावर श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर मधून देखरेख ठेवली जाणार आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागाची चमू कार्य करीत आहे. मंगळवारी आणि धरमपेठ झोनमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाची सर्वाधिक प्रभावित असल्याकारणाने तेथे आरोग्य यंत्रणा विशेष लक्ष देत आहे. आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे संशयित व निश्चित रुग्णांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरिता झोनस्तरावर अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त 1000 आशा स्वयंसेविकाद्वारे डास अळी व ताप रुग्ण शोध मोहीम करण्यात येत आहे.
आशा स्वयंसेविकांतर्फे शुक्रवारी 32,512 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून आता पर्यंत 2,42,159 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत 7,722 घरांमध्ये डास आढळले यामध्ये 8,575 दूषित कुलर, 7429 कुंड्या, 1665 मडके, 7079 टायर 4209 ड्रम्स, 1306 पक्षी व प्राण्यांचे भांडे दूषित आढळून आले आहेत.
डेंग्यू व चिकनगुनिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज असून, नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस “कोरडा दिवस” म्हणून पाळावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. घरी आणि परिसरात डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये यासाठी नागरिकांनी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यूचा लारवा पाण्यात वाढत असल्यामुळे कुठेही पाणी जमा होऊ नये याची काळजी घ्यावी. कुलर, कुंड्या यातील पाणी दररोज बदलावे. याशिवाय ताप असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन देखील डॉ. चौधरी यांनी केले आहे.