– पीओपी मूर्तीची खरेदी, विक्री साठवणूक केल्यास १० हजार रुपये दंड
नागपूर :- यंदाच्या गणेशोत्सवामध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सावाच्या अनुषंगाने दहाही झोनमध्ये मूर्ती स्वीकार केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी एक परिपत्रक जारी केले असून त्यात मार्गदर्शक सूचना नोंदविण्यात आलेल्या आहेत.
मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार विसर्जन स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने मनपाद्वारे ‘मूर्ती स्वीकार केंद्रा’ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. जे नागरिक विसर्जन स्थळी अथवा घरीच मूर्तींचे विसर्जन करण्यास इच्छूक असतील त्यांनी आपल्याकडील श्रीगणेशाची मूर्ती आपल्या संबंधित झोन कार्यालयात मूर्ती स्वीकार केंद्रात द्यावी, नागपूर महानगरपालिकेद्वारे मूर्तीचे सन्मानपूवर्क विधीवत विसर्जन केले जाईल. गणेश मंडळाची नोंदणी करण्याकरिता https://nmcnagpur.gov.in/RTS/ws/user/login.do ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे व गणेश मंडळांनी या लिंकवर नोंदणी करावयाची आहे. याशिवाय गणेश मंडळांच्या सोयी व सुविधेकरीता झोननिहाय सुविधा केंद्र देखील उभारण्यात येणार आहेत.
पीओपी मूर्ती बंदी
नागपूर शहरामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पी.ओ.पी. मूर्तीची खरेदी, विक्री, साठा यावर बंदी घालण्यात आली आहे. अवैधरित्या पी.ओ.पी. मूर्तीची खरेदी, विक्री, साठा करणाऱ्या व्यवसायीकाकडून मूर्ती जप्त करून व त्यांच्यावर किमान रु. १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल. पारंपारीक मूर्तिकार संघाच्या मागणीनुसार अनामत रक्कम ५००० रुपये पूर्णतः माफ न करता ५०० रुपये करण्यात येणार आहे. मूर्तिकार संघटनेच्या मागणीनुसार संघटनेला मातीच्या मूर्ती विक्री केंद्र उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मूर्तिकार बांधवांना विक्रीसाठी १०x१० फूट आकाराच्या पेंडॉलची निर्मिती करून दिली जाईल. त्यासाठी प्रति पेंडॉल प्रति दिवस एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येईल.
गणेश मंडपात जनजागृती करा
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळ, पूजा आयोजक समिती अथवा व्यक्तीद्वारे आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरांचे आयोजन करण्यात प्राधान्य देण्यात यावे. डेंग्यू, मलेरिया, हत्तीरोग यासारख्या आजारांची माहिती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छता, कचरा वर्गीकरण आदीबाबत जनजागृती करावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
४ फुटावरील मूर्तींचे विसर्जन कोराडी येथे
सार्वजनिक गणेश मंडळांनी ४ फूटपर्यंत उंची व रुंदी असलेल्या श्रीगणेशाच्या मूर्तींची स्थापना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ४ फुटापर्यंतच्या मूर्तींचे शहरातील विविध भागात स्थापित कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावे. ४ फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती असल्यास त्यांचे विसर्जन कोराडी तलाव परिसरातील कृत्रिम तलावामध्ये करण्यात येतील. घरगुती श्रीगणेशाच्या मूर्ती २ फूट आकाराच्या बसविण्याचे देखील आवाहन करण्यात येत आहे. घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच करण्याकरिता प्राधान्य द्यावे. श्री गणेश भक्तांनी सजावटीकरीता बंदी असलेल्या प्लास्टीक व थर्मोकॉलचा वापर करु नये.
शुल्क माफ
गणेश मंडळाच्या मंडपाच्या परवानगीसाठी आकारण्यात येणारे अर्ज पडताळणी व निरीक्षण शुल्क २०० रुपये व अनामत रक्कम १००० ते ५००० रुपये पूर्णपणे माफ करण्यात येत आहे. यासोबतच गणेशोत्सव २०२३ करीता मागीलवर्षी प्रमाणे गणेश मंडळाच्या मंडपाच्या परवानगीसाठी अग्निशमन विभागाचे शुल्क, मंडप उभारणीबाबत उद्यानखोत, मालमत्ता व खाजगी भुखंडावर आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येत आहे.