मी सुरक्षित ; माझे नागपूर सुरक्षित’ या प्रेरणेतून करूया कोरोना पायबंद, जिल्हाधिकारी आर. विमला यांचे आवाहन

नागपूर,दि.20 : ‘मी सुरक्षित ; माझे नागपूर सुरक्षित’ या प्रेरणेतून प्रत्येकाने या साथीला तोंड दिले तर आम्ही सर्व या संकटातून बाहेर पडू. जगाच्या इतिहासात साथ रोगातून बाहेर पाडण्यासाठी लसीकरण, विलगीकरण आणि जागरूकता ही त्रिसूत्री कामी आली आहे. त्याचाच वापर आपण करूया, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्र, महा – आयटी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त वेबवार्ता चर्चा संवादात त्या बोलत होत्या. कोरोनाच्या दोन लाटा नागपूर जिल्ह्याने आव्हान म्हणून स्वीकारल्या. उपलब्ध संसाधनांचा उपयुक्त वापर करत या कठीण काळात संघर्ष आजही सुरु आहे. प्रशासनाने दरम्यानच्या काळात भक्कम आधारभूत सुविधा निर्माण केल्या आणि आज प्रशासन सज्जतेच्या बाबतीत नागपूर स्वयंपूर्ण आहे. असे असले तरीही, तिसऱ्या लाटेची सौम्यता नागरिक फार सहजतेने घेत आहेत ही चिंता वाढवणारी बाब आहे.

साथरोग व स्वास्थ्याविषयक संकटांना जुना इतिहास आहे. रोगांच्या साथी येत राहिल्या, शास्त्रज्ञ चिकाटीने त्यावर उपाय काढीत आले व त्या त्या काळी शासन प्रशासन संकटांना तोंड देत आले. परंतु जनजागृती आणि लोकसहभाग हेच नेहमी प्रथम आयुध राहिले. सावध राहणे, स्वतःची काळजी घेणे हे आपल्या हातात आहे. एक नागरिक म्हणून सुद्धा ती आपल्या सर्वांची पहिली जबाबदारी आहे, याची जाण जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या निवेदनात करून दिली. ‘मी सुरक्षित – माझं नागपूर सुरक्षित ‘ असे आवाहन पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी नागपूरच्या जनतेस केले होते. त्या आवाहनास जनतेचा सक्रिय सहभाग लाभला. ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘ या मुख्यमंत्र्यांच्या हाकेला सुद्धा जनतेने साद दिली. कोरोनाच्या दोन लाटांमध्ये आपण सर्वांनी आप्तस्वकियांचे दुःख पाहिलेत. अनेकांनी प्रियजन गमावले, अनेकांना आजारपण भोगावे लागले, अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न आला आणि मानसिक ताण व अनिश्चिततेच्या वातारणाचा कंटाळातर आपण सर्वांनीच भोगला. आता हा गुंता संपवायचा आहे. लोकांकडून असेच सहकार्य राहिले तर हे संकट फार थोड्या दिवसांचे राहिले आहे, अशा भावना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी मांडल्या.

आज राज्यात सर्वाधिक ऑक्सिजन निर्मिती व साठवणूक क्षमता नागपूरची आहे. मोठ्या प्रमाणात बेड्सची उपलब्धता आहे. तालुकानिहाय कोविड कंट्रोल रूम्स आहेत. आतापर्यंत सर्व उपलब्ध संसाधनांचा सुयोग्य वापर करण्यात जिल्हा प्रशासनास यश मिळाले आणि सर्व हॉस्पिटल्सचीही वाखाणण्याजोगी साथ मिळत राहिली. पुढे दिसत असलेल्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भात जिल्हाधिकारी म्हणाल्या की, सद्यपरिस्थितीत लॉकडाउन लावण्याची गरज सध्या प्रशासनास वाटली नाही. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था व रोजगारावर वाईट परिणाम होतो यात दुमत नाही. परंतु लोकांचे जीव वाचवणे अधिक महत्वाचे आहे. आज बाजारात दुकानदार आणि ग्राहक मास्क घालून दिसत नाहीत. तज्ज्ञांनी ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर डबल मास्क घालण्याची सूचना दिलेली आहे. नागरिक कोरोनाची चाचणी सेल्फ टेस्ट किटने करतात. पण टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास कोविड कंट्रोल रूमला कळवत नाहीत. कोरोनाच्या दोन लाटांना तोंड दिल्यानंतर स्वाभाविकतः सर्वांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम झाला आहे. विशेषतः मधुमेह, उच्चरक्तदाब अशा को-मॉर्बिडिटीज असलेल्या लोकांनी आणि ज्येष्ठ

नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. दुर्दैवाने हवी तशी सक्रिय सतर्कता सध्या जनमानसात दिसत नाहीये. देशाच्या इतर अनेक भागांपेक्षा नागपूर जिल्ह्याची सद्यस्थिती फारच उजवी आहे. सार्वजनिक ठिकाणी व घरीही नागरिकांच्या छोट्या छोट्या चुकांमुळे हे चित्र पालटू नये यासाठी प्रशासन चौकस आहे, असे जिल्हाधिकारी आर. विमला म्हणाल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले. या कार्यक्रमा प्रसंगी निवासी उप-जिल्हाधिकारी विजया बनकर यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे प्रकाशित ‘दोन वर्षे जनसेवेची ; महाविकास आघाडीची’ ही माहितीपुस्तिका जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली. ऑनलाईन कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांचे तहसीलदार व इतर अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार विद्यार्थ्यांचे प्रस्ताव तत्काळ पाठवा

Thu Jan 20 , 2022
नागपूर दि. 20 : मागीलवर्षातील  फेब्रुवारी व मार्च 2021 मध्ये दहावी व बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयाचे  प्राचार्य व शाळांचे मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com