– जनसहभागातून जलपर्णी काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू
– अंबाझरी तलाव स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर :- शहरातील प्रसिद्ध अंबाझरी तलावात दिवसेंदिवस वाढत असलेली जलपर्णी जनसहभागातून काढण्याचा महत्वाकांक्षी निर्णय नागपूर महानगरपालिकेने घेतला आहे. या निर्णयाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित स्वयंस्फूर्तीने पुढे येत श्रमदान केले. रविवारी 16 जून रोजी सकाळी अंबाझरी तलावातून जलपर्णी काढण्याकरिता शेकडो हात सरसावल्याचे दिसून आले. ही मोहीम पुढील काही दिवस सतत सुरू राहणार असून, नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागपूरकरांचे आभार मानले आहे.
अंबाझरी तलाव स्वच्छतेसाठी इच्छुक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे,या मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी सकाळी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत श्रमदान केले. जलपर्णी ही पाच दिवससात दुप्पट होते त्यामुळे जनसहभागातून जलपर्णी तलावाबाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न मनपाद्वारे करण्यात येत आहे.याप्रसंगी मनपाचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार,धरमपेठ झोनचे सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे, अशोक घरोटे, मुख्य अग्निशमन अधिकारी बी पी चंदनखेडे कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षांनी, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे, ग्रीन व्हिजन फाउंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, प्रसिद्ध सायकलपटू डॉ. अमित समर्थ, जलतरणपटू जयंत दुबळे जयप्रकाश दुबळे, रवी परांजपे यांच्यासह केंद्रीय रिझर्व पोलीस दलाचे जवान, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अग्निशामन दलाचे जवान, मनपाच्या उपद्रव शोध पथकाचे जवान, जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन, डॉल्फिन स्पोर्टिंग क्लब, नागपूर डिस्ट्रिक्ट एक्वेटिक असोसिएशनचे जलतरणपटू, विजयिनी ग्रुप, सुभाष मंडळ, डिगडोह जागृती मंच,विदर्भ सर्प मित्र समिती, इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यंच्यासह अंबाझरी तलावात पोहायला येणारे नागरिक यांनी तलावातून जलपर्णी बाहेर काढण्यासाठी हातभार लावला.
मानवी साखळी तयार करून एकमेकांच्या हातात हात देत तलावातून जलपर्णी बाहेर काढण्यात आली. जलतरणपटू आणि विविध विभागाच्या जवानांनी पाण्यात पोहत रस्सीच्या सहाय्याने जलपर्णी तलावाच्या काठापर्यंत आणली, तेथून मशीनच्या साह्याने जलपर्णी बाहेर काढण्यात आली. जलपर्णी बाहेर काढण्याच्या कामासाठी मनपाद्वारे शेकडूनचे मनुष्यबळ व 10 पोकलेन मशीन, 10 जेसीबी मशीन 20 टिप्पर, पाण्यातील बोट, जलदोस्त मशीन अशी मशिनरी लावण्यात आली होती.
याबाबत माहिती देत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी माध्यमांना सांगितले की, अंबाझरी हा नागपुरातील एक प्रसिद्ध असा तलाव आहे. सध्या प्रदूषणामुळे या तलावात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अंबाझरी तलावातील जलपर्णीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मनपा सतत कार्य करीत आहे. मनपातर्फे वेगवेगळ्या पद्धतीने जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न केले जात असून, याचाच एक भाग म्हणून ही मोहीम राबविण्यात येत आहे. नागपूरकरांनी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला असून, तलावातून पूर्णतः जलपर्णी काढण्याचे काम मनपाद्वारें लवकरच पूर्ण केले जाईल. याकरिता नीरी संस्थेची मदत देखील मदत घेण्यात येत आहे. अंबाझरी तलावातून जलपर्णी काढण्याचे काम पुढील काही दिवस सतत सुरू राहणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
*अशी झाली मोहिमेची सुरुवात*
अंबाझरी तलावाला जलपर्णीच्या विळखातून बाहेर काढण्यासाठी केलेल्या आवाहनाला नागपूरकरांनी प्रतिसाद दिला. अंबाझरी तलावाचे वैभव परत मिळवून देण्याकरिता शेकडो नागरिक वस्ताद लहुजी साळवे उद्यानाच्या बाहेर एकत्रित आले. मनपाने केलेली पूर्वनियोजनाप्रमाणे नागरिकांनी मानवी साखळी तयार करीत जलपर्णी बाहेर काढण्याचे कार्य सुरू केले. विविध संस्थेचे स्वयंसेवक, मनपाचे अधिकारी, कर्मचारी फिरायला आलेले व्यक्ती यांनी एकाच वेळी नियोजनपूर्वक निश्चित ठिकाणी जाऊन श्रमदान केले. मनपाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनीही नागरिकांच्या बरोबरीने योगदान देत मोहिमेस हातभार लावला.
*चिमुकल्या सह ज्येष्ठांचाही सहभाग*
चिमुकल्यांसह ज्येष्ठ नागरिकांनी देखील या मोहिमेस हातभार लावला, आराध्या शर्मा या आठ वर्षीय चिमुकलीने वडिलांसोबत मिळून जलपर्णी तलावाबाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. तर 83 वर्षीय ज्येष्ठ नागरिक श्रीपाद बुरडे यांनी तलावाकाठी उतरून पाण्यातून जलपर्णी बाहेर काढली. त्यांना हे कार्य करताना बघून इतरांनाही प्रेरणा मिळाली. विशेष म्हणजे ते स्वतः सायकलने प्रवास करून मानकापूर ते अंबाझरी तलाव येथे आले होते. यावेळी नागरिकांनी मनपाद्वारे पुढाकार घेतल्याचे कौतुक केले. तसेच वेळ वेळोवेळी असे उपक्रम राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली.