केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतूद; विरोधकांची टीका अज्ञानातून – खा. नारायण राणे यांचा विरोधकांवर प्रहार

मुंबई :- केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अर्थसंकल्पाबाबत महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेल्या भरघोस निधीचा थांगपत्ताच त्यांना नसल्याने राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून होत आहे. त्यांनी अर्थसंकल्पाबाबतचे तुटपुंजे ज्ञान पाजळू नये अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी उबाठा, राहुल गांधी यांच्यावर प्रहार केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, प्रदेश प्रवक्ता ओमप्रकाश चौहान, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. कोणत्याही प्रकारचा सापत्न भाव न बाळगता महाराष्ट्रासह सर्व राज्यांसाठी भरभक्कम अशी तरतूद करून देशाला प्रगतीपथावर नेणारा असा हा अर्थसंकल्प आहे असेही त्यांनी नमूद केले.

खा. राणे म्हणाले की, या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आले नाही, अशी प्रतिक्रिया अर्थसंकल्पाबाबत तोकडे ज्ञान असलेल्या ठाकरेंकडून येणे अपेक्षितच होते. उद्धव ठाकरे यांनी स्वत:च ज्यावेळी अर्थसंकल्पाबाबतच्या आपल्या तुटपुंज्या ज्ञानाची कबुली दिली होती तेव्हाच त्यांची अर्थसंकल्प समजून घेण्याची कुवत कळली होती अशी खिल्ली त्यांनी उडवली. हा अर्थसंकल्प युवक, शेतकरी, महिला व गरीब अशा समाजाच्या प्रत्येक वर्गाला ताकद देणारा, गरीब शेतकऱ्यांना लाभ देणारा, युवकांना रोजगाराच्या अगणित संधी देणारा, दलित-मागास वर्गाला सशक्त करणारा, छोटे व्यापारी, लघु उद्योग यांना बळ देणारा, मध्यमवर्ग, उद्योजक यांना सक्षम करणारा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

यंदाचा अर्थसंकल्प हा 48 लाख 21 हजार कोटींचा असून मागील अर्थसंकल्पापेक्षा 3 लाख कोटींनी अधिक आहे. या अर्थसंकल्पाचे सर्व स्तरातून कौतुक होत असताना महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही असा सूर आळवणा-या उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांनी ठाकरे सरकारच्या काळातील अर्थसंकल्पातील आकड्यांचा सोयीस्कररित्या विसर पडल्याची टीका केली. उबाठा सरकारच्या अर्थसंकल्पातल्या तरतुदी, तुटीचे आकडे खा. राणे यांनी वाचून दाखविले. ठाकरे सरकारच्या काळातील दोन अर्थसंकल्पातील राजकोषीय तूटीचे आकडे सर्वांसमोर मांडत तूट काय असते हे देखील ठाकरे यांना बहुदा माहित नसावे अशी खोचक टिप्पणी राणे यांनी केली. उद्धव ठाकरे यांना चांगल्या भाषेत बोलताच येत नाही. विकसित भारताची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प समजून घ्यायचा असेल असेल तर मी अर्थसंकल्पाचे टिपण देईन असा टोला ही त्यांनी लगावला.

आपले अर्थसंकल्पाबाबतचे अज्ञान पाजळत राहुल गांधींनी या अर्थसंकल्पावर टीका केली असल्याचे ते म्हणाले. मोदी सरकारने मागच्या 10 वर्षांत अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत समाजातील शेवटच्या घटकाला लाभार्थी बनवून दाखवले. जागतिक बलाढ्य अशा अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था 10 व्या स्थानावरून 5 व्या क्रमांकावर आणली, असेही त्यांनी नमूद केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांच्या उपस्थितीत कारगिल विजय दिवस रजत जयंती समारोह साजरा

Sat Jul 27 , 2024
मुंबई :- कारगिल विजय दिवसाच्या रजत जयंती दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज (२६ जुलै) कुलाबा येथील शहीद स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शोक शस्त्र धून वाजविण्यात आली व हुतात्म्यांना सलामी देण्यात आली . कार्यक्रमाला महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग ले. जन. पवन चड्ढा, पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय जे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com