– आमदार संदीप जोशी यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन
नागपूर :- नागपूर शहरातील पाणी प्रश्नाच्या संदर्भात शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करुन चर्चा करण्यात यावी, अशी मागणी आमदार संदीप जोशी यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे. यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी (११ एप्रिल) पालकमंत्र्यांना निवेदन दिले.
नागपूर शहरात नागपूर महानगरपालिकेद्वारे ओसीडब्ल्यू मार्फत पाणी पुरवठा केला जातो. मात्र रोजच शहरातील कुठल्या ना कुठल्या भागामध्ये पाणी पुरवठा बाधित असतो. कधी ट्रिपिंगची समस्या तर कधी गळतीमुळे ब्रेकडाउन, कधी देखभाल दुरुस्तीसाठी शटडाउन अशी कारणे दाखवून रोजच पाणी पुरवठा बाधित केला जातो. या अनियमित पाणी पुरवठ्याचा त्रास शहरातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेला सोसावा लागतो. त्याचा रोष शहरातील लोकप्रतिनिधींकडे व्यक्त केला जातो. ऐन उन्हाळ्यात निर्माण झालेल्या या स्थितीकडे लक्ष देऊन प्रशासनाला सक्त निर्देश देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींची मनपा प्रशासन आणि ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार संदीप जोशी यांनी केली आहे.