नागपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला नागपूर शहर व जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 8,117 वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांची स्थापित क्षमता 33.32 मेगावॅट आहे तर त्यांना 53 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. याखेरीज शहर व जिल्ह्यातील 21,873 अर्ज प्राप्त झाले असून त्यावर काम चालू आहे. या योजनेचा वीज ग्राहकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या नागपुर प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी केले आहे.
महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेची राज्यात मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. विदर्भात महावितरण अंतर्गत नागपूर जिल्ह्याने (8,117) आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल अमरावती (3,231), अकोला (1,537), वर्धा (1,232) बुलढाणा (1,076), यवतमाळ (892), चंद्रपूर (891), भंडारा (761), गोंदीया (515), वाशिम (395) आणि गडचिरोली (384) यांचा क्रम लागतो. या योजनेत विदर्भातून आतापर्यंत 87,159 ग्राहकांनी अर्ज केले असून त्यापैकी 18,851 वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांची एकूण स्थापित क्षमता 76.74 मेगावॅट आहे व त्यांना 127 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. याशिवाय विदर्भात 66,443 वीज ग्राहकांकडे ही संयंत्रे लागण्यास सज्ज असून 1,152 ग्राहकांकडील कामे अंतिम टप्प्यात आहे.
त्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना एक किलो वॅट क्षमतेच्या प्रकल्पाला 30 हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला 60 हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला 78 हजार रुपये अनुदान मिळते. एक किलोवॅटच्या सौर यंत्रणेतून दरमहा सुमारे 120 युनिट वीज तयार होते. गरजेपेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीज बिल शून्य होते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीज बिल शून्य येते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते याशिवाय, सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांनाही आर्थिक लाभ होतो.
ते म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यात ही योजना सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत 48,202 वीज ग्राहकांकडे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले आहेत. त्यांची एकूण वीजनिर्मिती क्षमता 192.03 मेगावॅट असून त्यांना 319 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 2 लाख 41 हजार 178 ग्राहकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ग्राहकाच्या वीज आणि पैसे बचतीसोबतच पर्यावरण पुरक असलेल्या पंतप्रधान सुर्यघर- मुफ्त बिजली योजनेत सहभागी होऊन महावितरणच्या रुफ़ टॉप सोलरचा लाभ अधिकाधिक ग्राहकांनी घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहेअशी माहिती परेश भागवत यांनी दिली.