नागपूर :- नागपूर हेरिटेज संवर्धन समितीने गुरुवारी (ता.२०) नागपूर रेल्वे स्टेशन येथील हेरिटेज इमारतीचे संवर्धन तसेच महाल येथील पाताळेश्वर द्वाराचे नूतनीकरण प्रस्तावांना मंजुरी प्रदान केली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर शहरातील वास्तुशास्त्रीयदृष्ट्या जतन करावयाच्या हेरिटेज वास्तू/परिसराबाबत शासनाने समिती गठीत केली आहे. या समितीच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली.
समितीच्या गुरूवारी (ता.२०) नगर रचना विभाग, मनपा मुख्यालय येथे झालेल्या बैठकीमध्ये प्रसिद्ध वास्तुविशारद अशोक मोखा, हेरिटेज संवर्धन समितीचे सदस्य सचिव प्रमोद गावंडे, डॉ. शुभा जौहरी, नागपूर सुधार प्रन्यासचे कार्यकारी अभियंता मेघराजानी, रेल्वेचे एम.पी.एस. गिल, आयकर विभागाचे आर.बी. जोशी, एन. चॅटर्जी आदी उपस्थित होते.
नागपूर रेल्वे स्थानकाची मुख्य इमारत ही हेरिटेज इमारत असून त्याच्या नूतनीकरणाचे कार्य रेल लँड डेव्हलपमेंट करीत आहे. शासनमान्य हेरिटेज सूचीनुसार रेल्वे स्टेशन ग्रेड-२ चे स्थळ आहे व त्याची मालकी मध्य रेल्वेची आहे. या इमारतीच्या संवर्धन कार्याला समितीने मंजुरी प्रदान केली आहे.
नागपूर महानगरपालिकेतर्फे पाताळेश्वर मंदिर द्वारा चे नूतनीकरण करण्याच्या प्रस्तावाला देखील हेरिटेज समितीतर्फे मान्यता देण्यात आली आहे. शासनमान्य हेरिटेज सूचीनुसार पाताळेश्वर द्वार ग्रेड-१ चे स्थळ आहे. आयकर विभागातर्फे सेमिनरी हिल्स, सिव्हिल लाईन्स येथील बंगला क्रमांक ४३ए आणि ४३बी तोडून आयकर विभागाची नवीन इमारत प्रस्तावित करण्यात आली आहे. दोन्ही बंगले हेरिटेज सूचीमध्ये नसून सेमिनरी हिल ग्रेड-१ स्थळामध्ये आहे. या प्रस्तावाला सुद्धा हेरीटेज संवर्धन समितीतर्फे मान्यता देण्यात आली आहे.