वर्धा :-विकसित, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न महात्मा गांधींनी स्वातंत्र्यापूर्वी पासून पाहिले होते. वर्धा ही बापूजींची कर्मभूमी असून त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी देश या दिशेने निर्णायकपणे पुढे जात असताना वर्ध्याच्या भूमीचा यासाठी आशीर्वाद हवा आहे, असे भावपूर्ण आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. जनतेकडून मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता, विकसित महाराष्ट्र व विकसित भारताची संकल्पपूर्ती आता दूर नाही, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. काँग्रेस आणि इंडी आघाडीकडे मुद्द्यांचे दारिद्र्य असल्याने आता त्यांची पातळी घसरली असून केवळ शिव्याशाप देत ते मोदी सरकारच्या नावाने बोटे मोडत आहेत, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला, तेव्हा, ‘फिर एक बार, मोदी सरकार’ अशा घोषणांनी मैदान दुमदुमून गेले. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा.नवनीत राणा आदी उपस्थित होते.
वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ झालेल्या प्रचंड महाविजय संकल्प सभेत बोलताना प्रारंभीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भूमीत जन्मलेल्या महान संतांविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना विनम्र अभिवादन केले. वर्धा आणि अमरावती ही महात्मा गांधींची कर्मभूमी असल्याने माझे या भूमीशी भावनिक नाते आहे, असे सांगून त्यांनी जनतेशी संवाद साधला.
देशात काही चांगले घडणारच नाही, अशीच समजूत 2014 पूर्वी सर्वत्र पसरली होती. सर्वत्र निराशेचे, वैफल्याचे वातावरण होते. आपल्या गावात वीज, पाणी रस्ते येणारच नाहीत, असे गावांना वाटत होते. पिढ्यापिढ्यांना ग्रासलेल्या गरीबीतून मुक्ती मिळणारच नाही असे गरीबांना वाटत होते, कितीही कष्ट केले तरी हलाखीचे जीवन संपणारच नाही अशी शेतकऱ्यांची भावना झाली होती. पण ज्यांची कोणी दखलही घेतली नाही, त्यांची गरीबाच्या या मुलाने पूजा केली. 25 कोटी लोकसंख्येला आम्ही गरीबीतून बाहेर काढले. गावागावात वीज पोहोचविली, 11 कोटी लोकांना नळाच्या जोडण्या दिल्या. दहा वर्षांत चार कोटी गरीबांना पीएम आवास योजनेतून हक्काचे घर मिळाले. पन्नास कोटीहून जास्त लोकसंख्या जनधन बँक खात्यांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत जोडली गेली. तुम्ही गावागावांत, वाडीवस्तीत जाऊन जेथे घर नाही, गॅस जोडणी नाही, टॉयलेट नाही, नळाचे पाणी पोहोचले नाही अशा घरांपर्यंत पोहोचा, त्यांचा संपूर्ण तपशील घ्या आणि मला पाठवा, तुम्ही त्यांना मोदी की गॅरंटी द्या, आणि त्यांच्यापर्यंत न पोहोचलेल्या योजना पोहोचविण्याची हमी माझ्या वतीने त्यांना द्या, असे आवाहनही पंतप्रधानांनी जनसमुदायाला केले.
आज अभूतपूर्व आत्मविश्वासाने भारलेला देश मोदी की गॅरंटी अनुभवत आहे. गॅरंटी देण्यासाठी हिंमत लागते, कटिबद्धता लागते, आणि कितीही अडचणी आल्या तरी हा संकल्प पूर्ण करणारच असा निर्धार लागतो. गॅरंटी हा केवळ राजकीय खेळ नाही. त्यामागे देशाच्या,जनतेच्या सेवेसाठी क्षणक्षण वेचण्याचा संकल्प आहे, असेही मोदी म्हणाले.
भाजपाच्या संकल्पपत्रात येत्या पाच वर्षांत गरीबांसाठी तीन कोटी घरांचा संकल्प जाहीर केला आहे. देशातील प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहोचेल आणि घराघरातील 70 वर्षांवरील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या सेवेचा संकल्पही सोडला आहे. अशा व्यक्तींना मोफत उपचारांची जबाबदारी मोदींनी घेतली आहे. मोदींचा संकल्प भाजपाने आपल्या संकल्पपत्रातून जाहीर केला आहे. घराघरांतील स्वयंपाकघरांत पाईप गॅस जोडण्या पोहोचतील, ही मोदी की गॅरंटी आहे, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. देशाच्या कानाकोपऱ्यात आधुनिक रेल्वेगाड्या धावतील, बुलेट ट्रेनचे स्वप्न साकार होईल, चांद्रयान पाठोपाठ ‘गगनयान’ ही आकाशात झेपावेल. महिलांच्या सशक्तीकरणाविना देशाची समृद्धी अपूर्ण राहील. महिलांना स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून सक्षम करण्याकरिता मोदी सरकार सक्रीय आहे. वर्धा जिल्ह्यातच 1200 कोटींहून अधिक मदत मिळाली आहे. येत्या पाच वर्षांत महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रांतील सर्व संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी दिला. तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याची, गावागावातील मुलींना पायलट बनविण्याची हमीदेखील पंतप्रधान मोदी यांनी दिली.
काँग्रेस, इंडी आघाडी नेहमीच विकास व शेतकरी विरोधी राहिली. बारशाला गेला आणि बाराव्याला आला, अशी मराठीत एक म्हण आहे. काँग्रेसच्या या वागणुकीचा मोठा फटका विदर्भाला बसला आहे. पण आता आमचे सरकार, महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे महायुती सरकार सर्व शक्तिनिशी विदर्भाच्या विकासासाठी कार्यरत झाले आहे, असे सांगून श्री . मोदी यांनी विदर्भातील विकास कामांची यादीच सभेत सादर केली. 2014 पूर्वी देशातील 99 मोठे सिंचन प्रकल्प कित्येक दशके रखडले होते,त्यापैकी सर्वाधिक प्रकल्प महाराष्ट्रात होते. मोदी सरकारने या प्रकल्पांना गती दिली, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.