नागपूर :- मध्य रेल्वेच्या वर्धा नागपूर विभागातील बुटीबोरी-बोरखेडी स्थानकांदरम्यान दोन लेन रेल्वे ओवर ब्रिजच्या बांधकामाकरिता बुटीबोरी-उमरेड मार्गावरील जड वाहतुक इतर मार्गाकडे वळती करण्यात येणार आहे. या रेल्वे ओवर ब्रिजचे बांधकाम करण्यासाठी बुटीबोरी-उमरेड या मार्गावरील जडवाहतूक नागपूरच्या आऊटर रिंगरोड (एन.एच. 53) वरून वळती करण्यास 17 नोव्हेंबरपर्यंत परवानगी देण्यात आली होती. आता जड वाहतूक बंद करणे व वळण मार्गाची परवानगी देण्याबाबत अधिसूचनेद्वारे 15 जानेवारी 2023 पर्यंत दोन महिन्याची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यांनी आदेशित केले आहे
महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड हा महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांचे संयुक्त उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत एल. सी. गेट नं. 111 या ठिकाणी रोड ओव्हर ब्रिजचे बांधकाम सुरु आहे. हे गेट मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील वर्धा नागपूर विभागातील बुटीबोरी-बोरखेडी रेल्वे स्थानकादरम्यान येते.
बांधकाम सुरू असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत कामाच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत रस्ता जड वाहनांसाठी बंद करून जड वाहतूक इतर मार्गाने वळती करण्यात येणार आहे. जेणेकरुन मार्च 2023 पर्यंत रेल्वे पुलाचे काम पूर्ण केले जाऊ शकेल. हलकी वाहने (दोन चाकी, चार चाकी) यांची वाहतूक रेल्वे गेटवरून केली जाऊ शकणार आहे.
या ठिकाणी जड वाहतूक सुरू ठेवून पुलाचे काम करणे शक्य नसल्यामुळे काम करताना या मार्गावरील जड वाहतूक इतर मार्गाकडे वळती करणे आवश्यक आहे. तसेच हलक्या वाहनांची वाहतुक रेल्वे फाटकावरुन केली जाऊ शकते.