आमदारकी ही जागीरदारी झाली की काय ? 

वारंवार तीच ती व्यक्ती ‘आमदार’ होणे यावर नव्याने विचार व्हायला हवे. लोकशाहीसाठी हे चांगले लक्षण आहे का ? खरेतर काही अपवाद वगळता हे चांगले लक्षण नाही , असेच म्हणावे ! पण तसे म्हटले जात नाही. अलीकडे तो ‘बहुमान’ वा ‘उच्चांक’ वा ‘विक्रम’ असे मानले जाते. माध्यमांसाठी ती ‘बातमी’ होते. हे आता खूप वाढलेय. सरळ सरळ सरसकटता आलेली आहे.

पण सारासार विचार करता स्वस्थ लोकशाहीसाठी हे पूढे घातक ठरणारे होणार आहे.

हे आता किती वाढलेय याचा धक्का महाराष्ट्र विधानसभेच्या ताज्या तपशीलावरून कळेल. नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत या जागीरदारीने सारे उच्चांक मोडले. एकूण २८८ आमदारांत २१० आमदार हे परत , पुन्हा परत निवडून आले आहेत. म्हणजे पहिल्यांदाच निवडून येणारे आमदार केवळ ७८ आहेत. अर्थात ‘फ्रेशर्स’ केवळ २७ टक्के व उरलेले ७३ टक्के आमदार ‘रिपीटर्स’ आहेत. एकीकडे नवमतदारांची संख्या झपाट्याने वाढतेय. मात्र , नवआमदार झपाट्याने घटतायत. असा हा विरोधाभास आहे.

यातून , तरूण पिढीने आमदार होऊच नये की काय असे चित्र यातून उभे ठाकले आहे.

ज्येष्ठतेच्या तपशीलाची उदाहरणे द्यायची झाल्यास , मुंबईचे कालिदास कोळंबकर हे नऊ वेळा निवडून आले आहेत. वडाळा-नायगाव हा त्यांचा मतदारसंघ. सध्या कोळंबकर हे भाजपात आहेत. शिवसेना , कांग्रेस , भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. आमदार होण्याआधी एकदा ते नगरसेवक होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार सह दिलीप वळसे पाटील व जयंत पाटील हे आठ वेळा निवडून आले आहेत.

सात वेळा निवडून येणाऱ्यांत गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा , राधाकृष्ण विखे पाटील , छगन भुजबळ , सुधीर मुनगंटीवार , प्रकाश भारसाकळे , दिलीप सोपाल , विजयकुमार गावित यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह गणेश नाईक, चैनसुख संचेती , भास्कर जाधव , शिवाजी कर्डिले , हसन मुश्रीफ हे सहा वेळा निवडून आले आहेत.

दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह पाच वेळा निवडून येणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. अशीच चौथ्यांदा , तिसऱ्यांदा , दुसऱ्यांदा निवडून येणाऱ्यांची यादी वाढत जातेय.

आमदारकीची ही ‘विक्रमता’ खासदार , नगरसेवक , जिल्हा परिषद सदस्य या भागातही पसरली आहे. थोडाफार फरक असू शकेल. वरच्या सभागृहात (Upper house) तर वेगळेच घडतेय. या सभागृहात विविध क्षेत्रातील ‘विशिष्टां’नी वा ‘वैशिष्टां’नी यावे अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात अपेक्षेची माती झाल्याचे दिसते. ते वरचे स्थान आता तोंडाळांची सोय वा घरच्यांची व्यवस्था झालेय.

निवडून येणे वा उभे राहणे या वारंवारतेवर सर्वप्रथम अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज वाशिंग्टन यांनी नापसंती दर्शवली होती. ही प्रवृत्ती लोकशाहीला घातक असल्याचे ते म्हणायचे. त्यांच्या मते , आपण राजेशाही वा हुकूमशाही नाकारुन लोकशाही स्वीकारली ती एव्हढ्याचसाठी की एकच एका व्यक्तीचे राज्य नको. मी स्वतः नाकारण्यासाठी पुढाकार घेतला. तर मी वारंवार राष्ट्राध्यक्ष का राहू ? लोकांनी कितीही आग्रह केला तरी मी उभा राहणार नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा उभे रहायला आग्रह असतांना त्यांनी कठोरपणे झिडकारले.

बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या दिवसात भारतीय जनतेला खुले पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी या वाशिंग्टन घटनेचा उल्लेख केला आहे. त्यांना भारतात असे घडेल हे दिसत असावे. बाबासाहेब लिहितात , वाशिंग्टन प्रचंड लोकप्रिय होते. ते दहादा उभे झाले असते तरी त्यांचेविरुध्द कुणीही उभे झाले नसते. पण वाशिंग्टन यांनी संविधानिक नितिमत्ता ( Constitutional Morality ) जपली. दुसऱ्यांदा मोठ्या मुश्किलीने उभे रहायला तयार झाले. तिसऱ्यांदा मात्र स्पष्ट नकार दिला. सांसदीय लोकशाहीच्या यशस्वितेसाठी असे वागणे फार आवश्यक असल्याचे बाबासाहेबांचे मत होते.

दुसऱ्या एका प्रसंगात , राजकारणात भक्ती आणि विभूतीपूजा हा अधोगतीचा आणि नव्या हुकूमशाहीचा मार्ग असल्याचेही बाबासाहेब म्हणाले आहेत.

स्वातंत्र्य म्हणजे केवळ सत्तांतर नाही. शेवटच्या माणसापर्यंत सुख आणि संधी कशी जाईल याचा कृतीविचार करणारी ती बाध्यता आहे. याचमुळे संविधान देतांनाच्या ऐतिहासिक भाषणात बाबासाहेब, अमेरिकन मुत्सद्दी जेफरसन याचा हवाला देत म्हणतात , प्रत्येक पिढी हे एक स्वतंत्र राष्ट्र असते. पिढीला बंदिस्त करू नये. भावी पिढीला बदलविता येणार नाही असे कायदे आपण केले आणि भावी पिढीवर लादले तर वास्तवात हे जग मेलेल्यांचे असेल. जिवंत लोकांचे असणार नाही.

बाबासाहेब असे कां बोलले हे समजून घेण्याची नितांत गरज आहे.

अर्थात , काल घडलेले व आज घडत असलेले याचा थांबून विचार करावा लागेल. राजेशाही जाऊन लोकशाही जरुर आली. आता लोकशाहीच्या नावावर प्रभावशाही आली की काय ?

या नव्या ‘प्रभाव’शाहीची चिंता व व्याख्या व्हायला हवी!

 – रणजित मेश्राम

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राज्य लोकसेवा हक्क आयुक्तांची ‘अभिप्राय कक्षा’स भेट व पाहणी

Wed Dec 25 , 2024
Ø जिल्ह्याच्या अभिनव प्रयोगाचे आयुक्तांकडून कौतूक Ø कक्षाद्वारे लाभार्थ्यांकडून घेतला जातो ‘फिडबॅक’ Ø उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी युवा ऑपरेटरची टिम यवतमाळ :- केंद्र व राज्य शासनाच्या विविध सेवा ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवा सुरळीतपणे आणि निर्धारीत कालावधीत उपलब्ध होतात किंवा नाही याचा लाभार्थ्यांकडूनच दैनंदिन आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या संकल्पनेतून ‘अभिप्राय कक्ष’ सुरु करण्यात आला आहे. या कक्षास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!