आंतरराष्ट्रीय योग दिन : नागपूर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनातर्फे आयोजन
नागपूर :- नागपूर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने धंतोलीतील यशवंत स्टेडियमवर आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी योगासने केली. या आयोजनाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ना. नितीन गडकरी यांच्यासह योगाचार्य रामभाऊ खांडवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, जिल्हाधिकारी विपिन इटनकर, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांसोबत नागपूरकरांनी योगासने केली. यामध्ये ना. गडकरी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. तत्पूर्वी, त्यांनी योगाला जगात मान्यता मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ना. गडकरी म्हणाले, ‘आज आंतरराष्ट्रीय योगदिन संपूर्ण जगात साजरा केला जातो. योगाचा प्रचार प्रसार व्हावा आणि प्रत्येकाला निरोगी आयुष्य लाभावे, यासाठी या दिवसाची सुरुवात करण्यात आली. संपूर्ण जगात योगाला मान्यता मिळाली आणि आता १८० देशांमध्ये याचे आयोजन केले जाते, याचा आनंद आहे.’ नागपुरातही लोक मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय योगदिनामध्ये सहभागी होतात आणि योगाच्या प्रचारप्रसारात योगदान देतात ही कौतुकास्पद बाब असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
बालकांचे कौतुक
योगासनांनंतर नागपूर जिल्हा योगा संघटनेच्या प्रशिक्षणार्थींनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. लहान मुला-मुलींची प्रात्यक्षिके बघून ना. नितीन गडकरी यांनी त्यांचे कौतुक केले. यशवंत स्टेडियमवर उपस्थित नागपूरकरांनीही टाळ्यांच्या कडकडाटात या बालकांना कौतुकाची थाप दिली. यावेळी विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या मुलांना ना. गडकरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.