नागपूर (Nagpur) :- वर्धा मार्गावरील हॉटेल रेडीसन ब्लू ते जयताळा रोड तसेच यशोदा पब्लिक स्कूल ते जयताळा बाजार चौकापर्यंत पुढील चार महिने वाहतूक बंद राहणार आहे. या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक टी-पाईंट ते मंगलमूर्ती चौक या मार्गाने वळविण्यात आली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या घरासमोरून हा रस्ता जातो.
हॉटेल रेडीसन ब्लू ते जयताळा रोड तसेच यशोदा पब्लिक स्कूल ते जयताळा बाजार चौकापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील १० मार्च २०२३ पर्यंत या रस्त्याने वाहतूक बंद करण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज काढले. या मार्गाने दोन्ही बाजूची वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे नेहमी या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना टी-पॉईंट ते मंगलमूर्ती चौक या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
आयुक्तांनी या रस्ता बांधकामाठिकाणी आवश्यक तिथे सूचना फलक, वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक साधनाचा वापर करण्याचे आदेश कंत्राटदार कंपनीला दिले आहे. वळण मार्ग दर्शविणारे फलक, काम सुरू केल्याचे तसेच काम पूर्ण करण्याचा दिवस आदीचा तपशील असलेला फलक लावण्याचेही त्यांनी कंत्राटदाराला दिलेल्या आदेशात नमुद केले आहे. बॅरिकेड्स, सुरक्षा रक्षक, वाहतूक चिन्हाचे फलक वापर करावा लागणार आहे. याशिवाय बांधकामासाठी खोदकाम करताना निघणारी माती, गिट्टी, आयब्लॉक आदी बांधकामाच्या ठिकाणी न ठेवता त्याची विल्हेवाट लावण्यच्या सूचनाही त्यांंनी कंत्राटदाराला केल्या आहेत. रात्रीचे वेळी वाहनचालकांना माहितीकरीता एलईडी डाव्हर्सन बोर्ड लावणे, बॅरिकेड्सवर एलएडी माळा लावण्याचेही आयुक्तांनी नमुद केले आहे.