Ø कापूस व इतर पिक लागवड तंत्रज्ञानाची माहिती
Ø कपाशीची घन लागवडीची पध्दत व व्यवस्थापन
यवतमाळ :- येथील समता मैदानात आयोजित जिल्हास्तरीय कृषि महोत्सव व प्रदर्शनीत शेतकऱ्यांना कृषि किर्तनाच्या माध्यमातून कापूस व इतर पिकांची लागवड तंत्रज्ञान तसेच कृषिविषयक माहिती देण्यात आली. केंद्रीय कापुस संशोधन संस्था नागपूरचे डॅा.बाबासाहेब फंड यांनी हा किर्तनाचा प्रबोधनपर कार्यक्रम सादर केला.
चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी आत्माचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे होते. चर्चासत्राला डॉ. शैलेश गावंडे, प्रकल्प समन्वयक डॉ. राहूल फुके, गोविंद वैराळे, कृषि उपसंचालक तेजस चव्हाण, महिला आर्थिक विकास महामंडळाचे शैलेश जिद्देवार, आकाशवाणीच्या उद्घोषिका मंगला माळवे, शेतकरी मिलिंद वफले, प्रकल्प अधिकारी जगदिश नेरलवार व शेतकरी मोठ्या संस्थेने उपस्थित होते.
जिल्हा कृषि महोत्सव व प्रदर्शनीत विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या सत्रामध्ये शेतकऱ्यांसाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपुर येथील डॉ. बाबासाहेब फंड यांचा कृषि किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. आपल्या किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी कपाशी व इतर पिकाचे लागवड तंत्रज्ञान, बि-बियाणे निवड, पेरणीची पध्दत, एकात्मिक किड व्यवस्थापन, एकात्मिक रोग व्यवस्थापन, रासायनिक किड नाशकाची फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, काढणी, काढणी पश्चात तंत्रज्ञान इत्यादी बाबींची माहिती दिली.
चर्चासत्राचे अध्यक्ष संतोष डाबरे यांनी कपाशीची घन लागवड पध्दत, त्याकरीता उपलब्ध असलेले कापशीचे वाण, बेडवर कपाशीची लागवड करणे, संरक्षित सिंचनासाठी ठिबक सिंचनचा वापर करणे, ठिबक सिंचन संचाद्वारे विद्राव्य खते देणे, एकात्मिक किड व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, वेचणीच्या वेळी घ्यावयाची काळजी इत्यादी बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले.