– महिलांना शिलाई मशीन, फवारणी कीट, फेरीवाल्यांना हातगाडी भेट
यवतमाळ :- राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ, वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी आज रविवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. येथील जनसंपर्क कार्यालयात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी पालकमंत्री संजय राठोड यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली. जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज यवतमाळसह दिग्रस, दारव्हा, नेर व जिल्ह्यात सर्वत्र विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
यवतमाळ येथील वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात महिलांना शिलाई मशीन वाटप, गरीब व गरजू फेरीवाल्यांना हातगाडीचे वाटप अशा सामाजिक उपक्रमांसह शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आज वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. ना. संजय राठोड यांचे समर्थक, सामाजिक कार्यकर्ते गिरीश व्यास यांच्या पुढाकारातून पाच गरजू व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी हातगाडीचे वाटप करण्यात आले. यावेळी आरती गुल्हाने, उषा अवथरे, मनोहर जांभूळकर, संगीता वासनिक आणि राजू गोलाईत यांना ना. संजय राठोड यांच्याहस्ते हातगाडी भेट म्हणून देण्यात आली. या अनोख्या भेटीने हे सर्व फेरीवाल्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. या भेटीमुळे रोजगाराला बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया या सर्व लाभार्थ्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी शिवसेना यवतमाळ तालुका प्रमुख योगेश वर्मा यांच्या पुढाकारात 11 गरजवंत महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी या शिलाई मशीनचे ना. संजय राठोड यांच्य हस्ते वितरण करण्यात आले. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड यांच्या पुढाकारात 100 शेतकऱ्यांना फवारणी कीटचे वाटप ना. संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना सदस्य नोदंणीचा प्रारंभ ना. संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सदस्य नोंदणी करणाऱ्या सदस्यांना ना. संजय राठोड, युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य ॲड. दामिनी राठोड, हरिहर लिंगनवार, श्रीधर मोहोड, विशाल गणात्रा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
दोन क्विंटलचा हार, 50 किलोचा केक
पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. सोलापूर येथील समर्थक संदीप राठोड, युवराज चव्हाण यांनी तब्बल दोन क्विंटल (200 किलो) चा पुष्पहार व 50 किलोंचा केक आणला. हा पुष्पहार संजय राठोड व शीतल राठोड यांच्या गळ्यात घालण्यासाठी चक्क क्रेनचा वापर करण्यात आला. याशिवाय अनेक समर्थकांनी ढोल ताशे, सोलापूर येथील हलगी पथक, आदिवासी नृत्य अशा विविध पद्धतीने शुभेच्छा देवून वाढदिवस साजरा केला.
विविध मान्यवरांकडून शुभेच्छा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर, आमदारांनी प्रत्यक्ष फोनवर संपर्क साधून, समाज माध्यमांतून ना. संजय राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, महिला आघाडी संपर्क प्रमुख कालिंदा पवार, जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड, महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली मासाळ, याशिवाय पराग पिंगळे, बाळासाहेब दौलतकर, उपजिल्हा प्रमुख राजकुमार वानखडे, डॉ. बी.एन. चव्हाण, सचिन महल्ले, सुधाकर गोरे, विष्णू उकंडे, विनोद खोडे यांच्यासह दिग्रस शिवसेना तालुका प्रमुख उत्तमराव ठवकर, दारव्हा तालुका प्रमुख मनोज सिंगी, नेर तालुका प्रमुख मनोज नाल्हे, यवतमाळ तालुका प्रमुख योगेश वर्मा, कळंब तालुका प्रमुख अभि पांडे, राळेगाव तालुका प्रमुख मनोज भोयर, पांढरकवडा तालुका प्रमुख जयंत बंडेवार, वणी तालुका प्रमुख किशोर नांदेकर, झरी तालुका प्रमुख मोरेश्वर सरोदे, आर्णी तालुका प्रमुख राजेंद्र जाधव, उमरखेड तालुका प्रमुख प्रवीण मिरासे, संतोष जाधव, महागाव तालुका प्रमुख राजू राठोड, आदींसह पोहरादेवी येथील महंत, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विविध विभागातील अधिकारी यांच्यासह हजारो नागरिकांनी ना. संजय राठोड यांना शुभेच्छा देण्यासाठी जनसंपर्क कार्यालयात गर्दी केली होती.