यवतमाळ :- स्वातंत्र्य दिनी विविध कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील सर्व नागरिक, विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा. प्लॅस्टीक ध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे.
स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, फाटलेले, रस्त्यावर पडलेले, माती लागलेले राष्ट्रध्वज सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळी इतरत्र पडलेले आढळतात. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये.
राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सुजाण व जागरुक नागरिक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलिस यंत्रणेच्या मदतीने अशा प्रकारे प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. विक्रेत्यांनी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करु नये. प्लॅस्टीकचे ध्वज आढळून आल्यास संबंधित तहसिलदार किंवा नगरपालिका कार्यालयात असे ध्वज जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.