“वसुधैव कुटुंबकम करिता योग : हर घर – आंगण योग”
नागपूर :- विश्व योग दिनाच्या निमित्ताने हजारो नागपूरकर बुधवारी २१ जून २०२३ रोजी सकाळी ६ वाजतापासून यशवंत स्टेडियम येथे सामूहिक योगासन करणार आहेत. नागपूर महानगरपालिका व नागपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्ममाने आयोजित या कार्यक्रमात शहरातील विविध योगाभ्यासी मंडळ देखील सहभागी राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान केन्द्रीय मंत्री नितिन गडकरी भुषवतील. कार्यक्रमाला नागपूर शहर आणि जिल्हातील खासदार व सर्व आमदार तसेच सर्व अधिकारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील
बुधवारी सकाळी 6.00 वाजता हजारो योग साधक यशवंत स्टेडियमवर योग प्रात्यक्षिक सादर करतील. जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने यावर्षी ‘वसुधैम कुटुंबकम करिता योग’ ही संकल्पना असून ‘हर घर – आंगण योग’ ही थीम देशभर राबविली जाणार आहे.
योगाने शरीर आणि मनपाचे स्वास्थ उत्तम राहते. नियमित योगासनामुळे अनेक आजारांना दूर ठेवता येते. विशेष म्हणजे, भारताने जगाला दिलेली सर्वोत्तम देण असलेल्या योगाचा अंगीकार संपूर्ण जगाने केलेला आहे. अशात प्रत्येक भारतीयाने देखील योगाचा जीवनात अंगीकार करण्याची गरज आहे. निरामय आरोग्यासाठी नियमित योगासन गरजेचे असून प्रत्येकी घरी, अंगणात वैयक्तिकरित्या अथवा सामूहिकरित्या योगाभ्यास करणे आवश्यक आहे.
जागतिक योग दिनी नागपूरकर नागरिकांनी यशवंत स्टेडियम येथे उपस्थित राहून ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना योगाभ्यासातून जगाला दाखवावी, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.
विविध मंडळांचा सहभाग
नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित योग दिन कार्यक्रमात जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, आर्ट ऑफ लिव्हींग, गायत्री परिवार, मैत्री परिवार संस्था, श्री रामचंद्र मिशन, प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, एन.सी.सी. ईशा फाऊंडेशन, नागपूर जिल्हा योग असोशिएशन, नॅचरोपॅथी योग असोशिएनश, सहज योगध्यान केंद्र, योग सूत्र, श्रीयोग केंद्र, विवेक बहुजन हिताय संस्था आदींचा सहभाग राहील.