नवीमुंबई :- थोर संत व समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोकण भवनात आज त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोंकण भवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
संत गाडगेबाबा महाराजांचा जन्म शेणगाव (जि. अमरावती ) येथे परीट जातीत झाला. त्यांचे आडनाव जाणोरकार होते. त्यांचे मूळ नाव डेबूजी असे होते. तथापि त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना ‘गोधडे महाराज’ किंवा ‘गाडगे महाराज’ म्हणूनच ओळखत. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले. ‘चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये’, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत. पारंपरिक, पारमार्थिक विषयांसोबतच व्यावहारीक व नैतिक विषयांचाही त्यांनी आपल्या कीर्तनांतून लोकजागृतीसाठी चांगला उपयोग केला.