– राज्यपालांच्या हस्ते डॉ नरेंद्र जाधव यांच्या ‘आमचा बाप..’च्या २०० व्या आवृत्तीचे प्रकाशन संपन्न
मुंबई :-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून विख्यात अर्थतज्ज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी प्रमुख आर्थिक सल्लागार, माजी कुलगुरु, भारतीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य तसेच राष्ट्रपती – नियुक्त माजी खासदार डॉ नरेंद्र जाधव यांच्या ‘आमचा बाप आन आम्ही’ या पुस्तकाच्या २०० व्या आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते रविवारी (दि. १४) राजभवन मुंबई येथे करण्यात आले.
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यामुळे डॉ नरेंद्र जाधव यांच्याप्रमाणेच करोडो उपेक्षित लोकांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली, त्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी ‘आमचा बाप आन आम्ही’ या पुस्तकाची दोनशेवी आवृत्ती प्रकाशित होणे औचित्यपूर्ण आहे, असे राज्यपालांनी सांगितले. डॉ नरेंद्र जाधव यांचे ‘आमचा बाप…’ हे दोनशेवी आवृत्ती प्रकाशित होणारे मराठी भाषेतील पहिले पुस्तक ठरल्याबद्दल तसेच ते मराठी भाषेतील पहिले ‘इंटरनॅशनल बेस्टसेलर’ ठरल्याबद्दल राज्यपालांनी डॉ जाधव यांचे अभिनंदन केले.
मानव संस्कृतीच्या इतिहासात डॉ बाबासाहेब आंबेडकर एक अद्वितीय युगपुरुष होते. शतकानुशतके चालणाऱ्या अन्यायकारी जातीयवादी समाज व्यवस्थेच्या विरुद्ध ते उभे ठाकले. भारत तसेच अमेरिकेत उच्च शिक्षण घेतल्यानंतर ते आपल्या उपेक्षित बांधवांच्या मुक्तीसाठी भारतात परतले. स्वातंत्र्यानंतर भारत एकसंध राहण्यात तसेच आज जगातील आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येण्यात डॉ आंबेडकर यांचे योगदान अनमोल आहे असे राज्यपालांनी सांगितले.
डॉ नरेंद्र जाधव हे आजच्या काळातील थोर लेखक विचारवंत असून त्यांनी देशातील प्रगतिशील विचार धारेला समृद्ध केले आहे. ‘आमचा बाप आन आम्ही’ हे पुस्तक १४ भाषांमध्ये अनुवादित झाले असून आता त्याचे ऑडिओ बुक व्हावे तसेच ब्रेल लिपीतून त्याची आवृत्ती निघावी अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
लौकिकार्थाने जरी ‘आमचा बाप’ हा आपल्या पुस्तकाचा नायक असला तरी, खऱ्या अर्थाने या पुस्तकाचे ‘मूकनायक’ डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच असल्याचे डॉ नरेंद्र जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले. पुस्तकाच्या आजवर देशविदेशात ८ लाख प्रती विकल्या गेल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला डॉ जाधव यांच्या पत्नी वसुंधरा जाधव, ‘ग्रंथाली’ प्रकाशन संस्थेचे सुदेश हिंगलासपूरकर तसेच डॉ जाधव यांचे कुटुंबीय उपस्थित होते.