मुंबई :- विद्यार्थी हा शिक्षण विभागाच्या विविध योजना आणि उपाययोजनांचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी जे जे करणे आवश्यक आहे त्या उपाययोजना करून त्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य वजाहत मिर्झा यांनी खासगी शिकवणी वर्गावर निर्बंध असावेत यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर यांनी खासगी शिकवणी वर्गाबाबत शासन हस्तक्षेप करीत नाही, असे सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी खाजगीत कुठे शिक्षण घ्यावे, यावर शासनाचे बंधन नाही. तथापि, खासगी शिकवणी वर्ग खासगी असले तरीही त्याठिकाणी विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात की नाही यासंदर्भात तपासणी करण्यात येईल. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शिक्षणावरही शासनामार्फत भर दिला जात आहे. आता पुस्तकांमध्ये कोरी पाने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देऊन अभ्यासक्रम अधिक दर्जेदार होण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अनिकेत तटकरे, गोपीचंद पडळकर, एकनाथ खडसे, अमोल मिटकरी, धीरज लिंगाडे, ॲड. मनीषा कायंदे आदींनी सहभाग घेतला.