– ‘ऊर्जावरण – २०२५’ कॉन्फरन्समध्ये साधला संवाद
नागपूर :- रस्ते आणि इमारतींच्या बांधकामात वेस्ट मटेरियलचा वापर करणे काळाची गरज आहे. कारण आज बांधकामावर खूप मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. मजबुत व चांगल्या गुणवत्तेचे रस्ते निर्माण करणे तसेच सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा घरांची निर्मीती करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार, दि. ३ जानेवारी) केले.
खामला येथील अर्जुना सेलिब्रेशन येथे ऊर्जा व पर्यावरण विषयावर आधारित ‘ऊर्जावरण – २०२५’ या परिषदेत ना. गडकरी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘जल, ध्वनी आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे हे आज सर्वांत मोठे आव्हान आहे. दिल्ली येथे वायू प्रदूषणामुळे तेथील लोकांचे आयुष्य दहा वर्षांनी कमी होत आहे. सरकार त्यावर उपाययोजना करत आहे. पण आमच्या मंत्रालयाने पर्यावरण रक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देत रस्ते बांधणीत वेस्ट मटेरियलचा वापर करून पहिले पाऊल टाकले आहे.’
वातावरणातील बदलांमुळे आज जग अनेक समस्यांचा सामना करत आहे. त्यात वाहतुकीसाठी पर्यायी इंधनाचा मार्ग निवडणे गरजेचे आहे. इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, इलेक्ट्रिक, सीएनजी, बायो-सीएनजीच्या वापराला सुरुवात देखील झाली आहे. आपल्या देशात आज २२ लाख कोटी रुपयांचे फॉसिल फ्युएल आयात केले जाते. हा खर्च कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर गरजेचा आहे, याचाही ना. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला.
अनेक ठिकाणी बांबू क्रॅश बॅरियर निर्माण करून आम्ही रस्ते निर्मितीमधील खर्च तर कमी केलाच, शिवाय पर्यावरण रक्षणातही हातभार लावला आहे. स्टीलच्या ऐवजी बांबुचा वापर रस्त्यांमध्ये होऊ लागला आहे. राईस स्ट्रॉपासून (परली) बायो-सीएनजीची निर्मिती होऊ लागली आहे. देशात सीएनजी निर्मितीचे ४०० प्रकल्प कार्यरत आहेत. तुमसरमध्ये देखील एका प्रकल्पात काम सुरू आहे. मनसर येथे राष्ट्रीय महामार्गावरील एक टप्पा बायो-बिटुमेनचा वापर करून तयार करण्यात आला आहे, असेही ना. गडकरी म्हणाले. दिल्ली ते चंदिगड, मुंबई ते दिल्ली या महामार्गांच्या बांधकामात ८० लाख टन कचरा वापरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.