Ø योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा
Ø आरोग्य केंद्रनिहाय लाभार्थी नोंदणीचे उद्दिष्ट
यवतमाळ :- राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांना लाभ द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केल्या.
महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.एस.राठोड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी ग्रामस्तरावर एएनएम, आशा वर्कर यांच्या मार्फत जेष्ठांचे योजनेसाठी अर्ज भरून घ्या. जिल्ह्यात 66 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रांना सुरुवातीस प्रत्येकी 1 हजार जेष्ठांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात यावे. प्रत्येक आठवड्यात या योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला जावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
योजनेंतर्गत पात्र जेष्ठ नागरिकांना एकरकमी 3 हजार रुपये बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात प्रदान करण्यात येणार आहे. या अर्थसहाय्यातून वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता, दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील.
लाभार्थी व्यक्तीचे वय 65 वर्षापेक्षा जास्त असावे. वृद्ध व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा. आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह आहे.
लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे. सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. अर्जासोबत आधारकार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेची बॅंक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं-घोषणापत्र, ओळखीचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.