मध्य भारतातील शिक्षणाची गंगोत्री

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शंभरावा वर्धापन दिन ४ ऑगस्ट २०२३ रोजी होऊ घातला आहे. पारतंत्र्यात उदयाला आलेली ही ज्ञान संस्था आजच्या जागतिकीकरणाच्या युगातही पैलुंनी विकसित होत आहे.कितीतरी उमलत्या मनांना या ज्ञानसंस्थेने आकार दिला आहे. कित्येकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करीत नवे आकाश, नवे क्षितिज दिले आहे. शंभर वर्षे पूर्ण करणाऱ्या नागपूर विद्यापीठाचा इतिहास देखील गौरवशालीच राहिला आहे.या विद्यापीठातून शिक्षण घेत अनेक नामवंत निर्माण झाले आहे.नवीन संकटे तसेच आव्हानांचा सामना समर्थपणे करीत विद्यापीठाचा विकास अधिक भरभराटीने होताना दिसत आहे. 4 आगस्टर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात होणा-या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त विद्यापीठाच्या आजवरच्या देदिप्यमान वाटचालीचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न…

४ ऑगस्ट ,१९२३ रोजी नागपूर विद्यापीठाची स्थापना झाली. मात्र त्यापूर्वी जवळपास २० वर्षे त्यासाठी प्रयत्न होत होते.१९१४ च्या सुमारास त्या दिशेने पहिले पाऊल पडले.सॅडलर कमिशनच्या अहवालानंतर एका अधिकृत समितीची स्थापना झाली आणि विद्यापीठाची निर्मिती करण्याबाबत प्राथमिक प्रयत्नांना आरंभ झाला.प्रथम महायुद्धाची झळ पोहोचली असताना १९२० नंतर या प्रयत्नांना पुन्हा चालना मिळाली.छत्तीसगड, जबलपूर, रायपूर, विदर्भ आणि वऱ्हाड प्रांत या विशाल भागासाठी एक विद्यापीठ स्थापन करण्याची निश्चित झाले.१९२३ साली पास झालेल्या कायद्यानुसार नागपूर विद्यापीठ अस्तित्वात आले.मध्य प्रांताचे सरकार आणि त्यामधील शिक्षण मंत्री रावबहादुर एन.के. केळकर यांचे यात मोठे योगदान होते.सर फ्रांक स्लाय यांच्यासारखे कुलपती आणि सर बिपिन कृष्ण बोस यांच्यासारखे संस्थापक कुलगुरू विद्यापीठाला लाभले.विद्यापीठ म्हणजे सरकारचे एक डिपारमेंट नव्हे. ‘विद्यापीठाचा प्रमुख उद्देश व कार्य म्हणजे शिकवणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे हे होय.’ ही स्वातंत्र्यपूर्व काळात विद्यापीठाच्या धोरणाची प्रमुख सूत्रे होती. विद्यापीठाची अत्यंत साधेपणाने सुरुवात झाली.विद्यापीठाची निर्मिती झाली त्यावेळी प्रथम दोन महत्त्वाची पदे निर्माण करण्यात आली.एक कुलगुरूंचे आणि दुसरे कोषाध्यक्षांचे.बिपिन कृष्ण बोस हे पहिले कुलगुरू .व्ही.एम.केळकर हे पहिले कोषाध्यक्ष होते.

सर जमशेदजी टाटा यांनी दिलेल्या एक लाख रुपयांच्या देणगीतून विद्यापीठाची मूळ वास्तू उभी राहिली.१९३५ च्या सुमारास विद्यापीठाला एक प्रकारची स्थिरता प्राप्त झाली. त्यानंतर संवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले.भौगोलिकदृष्ट्या फार मोठा भूप्रदेश विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येत असला तरी प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच महाविद्यालये संलग्न होती.यामध्ये मॉरिस कॉलेज, हिस्लाॅप कॉलेज, किंग एडवर्ड कॉलेज, रॉबर्टसन कॉलेज आणि स्पेन्सर ट्रेनिंग कॉलेज यांचा समावेश होता.६ महाविद्यालये, ९१७ विद्यार्थी आणि ४ विद्याशाखा हे विद्यापीठाचे आरंभीचे चित्र होते.विद्यापीठासाठी जागा नसल्याने नागपूरकरांच्या दातृत्ववृत्तीला आवाहन करण्यात आले.सुरुवातीला जेथे जागेचा प्रश्न होता तेथे आज २६३ एकर जागेवर विद्यापीठाचा भव्य परिसर आहे.अनेक आकर्षक आणि देखण्या वास्तूंनी हा परिसर नटलेला आहे.१९७२-७३ च्या काळात संपूर्ण विदर्भात महाविद्यालयांची संख्या शतक पार करून गेली.महत्त्वाच्या शहरांमध्ये, तालुक्याच्या गावीही महाविद्यालये उघडण्यात आली.१९७३ ते ८३ या दहा वर्षाच्या काळात संलग्न महाविद्यालयांची संख्या १३९ वर गेली. त्यावेळी विद्यापीठाच्या नियंत्रणात चार महाविद्यालय ३१ शैक्षणिक विभाग होते नोंदणीकृत विद्यार्थी ६३ हजार १४० तर एकूण परीक्षार्थींची संख्या १ लाख १३ हजार वर गेली होती. १ मे १९८३ ला नागपूर विद्यापीठामधून अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.त्यावेळी विदर्भाच्या आठ जिल्ह्यांपैकी चार जिल्हे अमरावती विद्यापीठाकडे गेले.जवळपास अर्धा भाग नागपूर विद्यापीठाच्या अखत्यारितून गेला.४ मे २००५ पासून नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.१३ डिसेंबर २००५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत नामविस्तार कार्यक्रम अतिशय भव्य पणे साजरा करण्यात आला. २ ऑक्टोंबर २०११ पासून चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांचा समावेश असलेले गोंडवाना विद्यापीठ हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठापासून वेगळे झाले. आता पुन्हा लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेला लक्ष्मीनारायण अभिनव तंत्र विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला आहे.लक्ष्मीनारायण तंत्र संस्था देखील विद्यापीठापासून स्वतंत्र होत आहे.अशा स्थितीत भौगोलिक दृष्टीने विद्यापीठाचा विस्तार कमी झाला.तथापि सातत्याने वाढणारी महाविद्यालयांची व विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.

शहराच्या विविध ११ भागात विद्यापीठाच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा पसरल्या आहेत. लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेचा परिसर, विधी महाविद्यालय परिसर, रामदास पेठेतील ज्ञान स्त्रोत केंद्राचा परिसर, शंकरनगरच्या भागातील गांधी भवनाचा परिसर, अंबा विहार परिसर या व्यतिरिक्त विद्यापीठाची संबंधित संलग्न महाविद्यालय हा सगळा व्याप लक्षात घेतला तर नागपूरच्या जनजीवनाचा किती मोठा भाग व्यापला आहे याची जाणीव होते. जिथे ६ महाविद्यालये होती तेथे आता ५१२ महाविद्यालये आहेत. विद्यार्थ्यांची संख्या हजारावरून लाखांवर पोहोचली आहे तीन दशकांमध्ये विद्यापीठाचा एकही पदवीधर शिक्षण विभाग नव्हता तिथे आज जवळपास ४८ पदव्युत्तर विभाग कार्यरत आहे.

विद्यापीठांमध्ये क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग कार्यरत आहे.शहराच्या मध्यभागी रावबहादूर बी लक्ष्मीनारायण परिसरात १४ एकरामध्ये क्रीडांगणे विकसित करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातही मोठी भरारी मारली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायान परिषदेमार्फत पुनर्मूल्यांकन करून विद्यापीठाला ‘अ’ दर्जा उच्च प्रदान केला आहे. शताब्दी महोत्सवी वर्षात ३ ते ७ जानेवारी २०२३ दरम्यान इंडियन सायन्स काँग्रेस व १९ ते २१ फेब्रुवारी २०२३ दरम्यान फार्मस्युटीकल सायन्स काँग्रेसचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे २१ सप्टेंबर २२ रोजी स्वातंत्र्यसंग्राम में जनजातीय नायको का योगदान या विषयावर भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याच कार्यक्रमात देशात पहिल्यांदाच ट्रायबल सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रसंतांच्या कार्यात प्रसार प्रचार व्हावा म्हणून प्रथम साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले त्याचप्रमाणे राष्ट्रसंत व्याख्यानमाला देखील सुरू करण्यात आल्या. नागपूर हे शैक्षणिक, उद्योग आणि वैद्यकीय क्षेत्राचे हब म्हणून विकसित होत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पारंपारिक शिक्षणासोबत व्यवसाय कौशल्याचे धडे देणे गरजेचे आहे.त्यासाठी विद्यापीठाने शंभर पेक्षा अधिक कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत सुरू केले आहे.परीक्षा पद्धतीत अमुलाग्र बदल करून श्रेयांक नोंदणी सुरू केली आहे. ABC मध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी अनिवार्य करण्यात आली असून अनेक वर्षांपासून रखडलेल्या पी.एचडी.संशोधन प्रबंधांचे सादरीकरण आता ऑनलाईन घेतले जात आहे.वैद्यकीय क्षेत्रातील रोजगार लक्षात घेता फोर्ड कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.विद्यापीठात डिफेन्स स्टडी सेंटर सुरू केले असून त्यासाठी आयुध निर्माण सोबत करार केला आहे.विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि नोकरीची संधी यातून मिळणार आहे.रोजगार व प्रशिक्षण सेल निर्माण करी विविध कंपन्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. शताब्दी वर्षात विद्यापीठाने ‘रीच टू अनरिच्ड’ हा उद्देश बाळगून ग्रामीण व आदिवासी क्षेत्राशी विद्यापीठाची नाळ जोडलेली आहे. या दृष्टीने विद्यापीठ प्रयत्नशील आहे शिवाय शताब्दी वर्षानिमित्त एका वर्षापासून विविध नाविन्यपूर्ण विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद, निबंध स्पर्धा व कार्यशाळा आयोजित केल्या जात आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या मदतीने ‘ग्राम चलो अभियान’ राबविले जात आहे.अशा पद्धतीने आपल्या शताब्दी वर्षात विद्यापीठाची देदीप्यमान वाटचाल सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय आयुक्त कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

Thu Aug 3 , 2023
नागपूर :- क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात आज साजरी करण्यात आली. उपायुक्त (सामान्य) प्रदीप कुलकर्णी यांनी क्रांतिसिह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त विवेक इलमे, कमलकिशोर फुटाणे, तहसिलदार नारायण ठाकरे, नायब तहसिलदार आर.के. डिघोळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com