महागाव येथील एकाच परिवारातील पाच व्यक्तींच्या मृत्युचे रहस्य उलगडण्यास गडचिरोली पोलीसांना यश

गडचिरोली :-मागील काही दिवसापासुन मौजा महागाव तह. अहेरी जि. गडचिरोली येथील रहिवासी शंकर पिरु कुंभारे यांचेसह त्यांचे परिवारातील चार व्यक्तींचा अवघ्या विस दिवसाचे कालावधीत अचानक आजारी पडुन मृत्यु झाल्याने त्या परिसरात भितीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले.

सर्व प्रथम दिनांक 20/09/2023 रोजी शंकर कुंभारे व त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना अहेरी व त्यानंतर चंद्रपूर व शेवटी नागपूर येथील नामांकित रुग्णालयात उपचारकामी भरती करण्यात आले. परंतु दिनांक 26/09/2023 रोजी शंकर कुंभारे व दिनांक 27/09/2023 रोजी त्यांच्या पत्नी विजया कुंभारे यांचा लागोपाठ दिवसात मृत्यु झाला. त्या धक्यातुन सावरत असतांना अचानक त्यांची गडअहेरी येथे राहणारी त्यांची मुलगी कोमल दहागावकर व मुलगा रोशन कुंभारे यांची तसेच शंकर कुंभारे यांची मुल येथे राहणारी साली आनंदा ऊर्फ वर्षा उराडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आले. अनेक औषध उपचार करुन देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न होता दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामध्ये दिनांक 08/10/2023 रोजी कोमल दहागावकर दिनांक 14/10/2023 आनंदा ऊर्फ वर्षा उराडे व दिनांक 15/10/2023 रोजी रोशन कुंभारे याचा मृत्यु झाला.

आई वडील उपचारकामी रुग्णालयात भरती असल्याची माहिती मिळताच शंकर कुंभारे यांचा दिल्ली येथे नोकरी निमित्य वास्तव्यास असलेला मोठा मुलगा सागर कुंभारे हा चंद्रपूर येथे आला असता, आई वडीलांच्या मृत्युनंतर तो दिल्ली येथे परत गेल्यावर अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास उपचारकामी दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याचप्रमाणे शंकर कुंभारे व विजया कुंभारे यांना अहेरी येथुन चंद्रपूर येथे उपचारकामी नेणारा त्यांच्या कारचा चालक राकेश मडावी याची देखील दुस­या दिवशीपासुन प्रकृती बिघडल्याने त्याला देखील चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारकामी भरती करण्यात आले. तसेच नातलग भरती असल्याने त्यांना मदतीच्या उद्देशाने शंकर कुंभारे यांच्या सालीचा मुलगा चंद्रपूर व नागपूर येथे आल्याने त्याची देखील प्रकृती बिघडल्याने त्याला उपचार कामी रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या तीनही व्यक्तींची प्रकृती स्थिर असुन प्रकृतीत सुधारणा होत असल्याबाबत वैद्यकिय अधिकारी यांनी कळविले आहे.

मृत्यु पावलेल्या पाच व्यक्ती व सध्या उपचार घेत असलेल्या तीन व्यक्तींनमध्ये हातापायाला मुंग्या येणे, कंबरेखालील भागामध्ये व डोक्यामध्ये प्रचंड वेदना व ओठ काळे पडुन जीभ जड पडणे यासारखे एकसमान लक्षणे दिसुन आली. सदर लक्षणावरुन मृत व आजारी व्यक्तींना कुठलीतरी विष बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकिय अधिकारी यांनी वर्तवीला परंतू त्यांच्या करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये ते विषाबाबत अधिक निश्चीत माहिती निष्पन्न झाली नाही.

एकाच परिवारातील पाच व्यक्तींच्या अल्पावधीत झालेल्या गुढ मृत्युमुडे संपूर्ण परिसरात शोककळा पसरुन भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सदरबाब पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अत्यंत गांभिर्याने घेवुन अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी सुदर्शन राठोड, पोस्टे अहेरीचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांदे व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी व त्यांच्या तपास पथकास सदर गुन्हा उघडकिस आणण्याची जबाबदारी सोपविली.

तपास यंत्रणेने तात्काळ वेगवेगळे चार तपास पथक गठीत करुन त्यांची परिसरातील गोपणीय यंत्रणा सक्रिय करुन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्रात तसेच तेलंगणा राज्यात तपास करुन गुन्हा उघडकिस आणण्याचे प्रयत्न सुरु केले असतांना, परिसरातील गोपनीय सुत्रांकडुन गावात शंकर कुंभारे यांची सुन संघमित्रा कुंभारे व साल्याची पत्नी रोझा रामटेके यांचा गुन्ह्रात सक्रिय सहभाग असल्याचे माहिती मिळाली. त्यावरुन त्या दोघींच्याही हालचालींवर पोलीसांनी बारकाईने लक्ष ठेवुन त्यांना आज दिनांक 18/10/2023 रोजी ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता, त्या दोघींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्राचा सखोल तपास केला असता, महिला आरोपी संघमित्रा कुंभारे हिने रोशन कुंभारे याचेशी तिच्या आई वडीलांच्या विरोधात जावुन लग्न केले व या कारणामुळे तिच्या वडीलांनी आत्महत्या केली. तसेच याबाबत पति रोशन व सासरचे मंडळी तिच्या माहेरच्या लोकांच्या नावे वारंवार टोमणे मारत असत, तसेच सह आरोपी रोझा रामटेके हिने तिच्या सास­यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीत शंकर कुंभारे यांची पत्नी विजया कुंभारे व तिच्या इतर बहिणी हिस्सा मागुन नेहमी वाद करित असल्याच्या कारणावरुन त्या दोघींनी संपुर्ण कुंभारे परिवार व त्यांचे नातलागांना विष देवुन जिवे ठार मारण्याची योजना आखली. त्या योजनेप्रमाणे रोझा रामटेके हिने तेलंगणा राज्यात जावुन विष आणले व ते विष जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या दोघींनी मृतकांच्या व आजारी व्यक्तींच्या खाण्यापिण्याच्या वस्तुंमध्ये मिसळुन त्यांना खाण्यास दिल्याने त्या विषाचा हळुहळु परिणाम होवुन त्या सर्व व्यक्ती एका पाठोपाठ आजारी पडण्यास सुरवात झाली व त्यात पाच व्यक्तींचा मृत्यु झाला. राकेश मडावी हा शंकर कुंभारे यांचे परिवारातील नव्हता परंतू तो त्यांच्या गाडीतील पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमधील पाणी पिल्याने विषबाधा होवुन तो आजारी पडला.

सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अहेरी येथे अप क्र. 374/2023 कलम 302, 307, 328, 120 (ब) व 34 भादवि अन्वये गुन्हा नोंद करुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी सुदर्शन राठोड हे करित असून सदर गुन्ह्रातील दोन्ही महिला आरोपी यांना आज दिनांक 18/10/2023 चे 09:52 वा. अटक करण्यात आली. तसेच सदर गुन्ह्रात इतर आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. सदर गुन्हा उघडकिस आणण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अहेरी व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मतदार नोंदणीचे काम युध्दस्तरावर करा –डॉ. विपीन इटनकर

Wed Oct 18 , 2023
– नवमतदारांची नोंदणीची जबाबदारी मुख्याध्यापकांनी स्विकारावी निवडणूक विषयक आढावा बैठक नागपूर :– लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाची टक्केवारीत वाढ करणे फार महत्वाचे असून त्यादृष्टीने सर्वांनी मतदार नोंदणीचे काम युध्दस्तरावर करावे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने कामात गती आणा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निवडणूक यंत्रणेस दिले. सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदारनोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com