आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थी नागरिकांना ५ लक्ष रुपयांचा मोफत आरोग्य विमा!

महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्मान भारत योजना राबविली जात असून या योजनेंतर्गत ५ लाखांपर्यंत आरोग्य विमा कवच पात्र लाभार्थी नागरिकांना देण्यात येत आहे. या आरोग्य विम्याच्या माध्यमातून खाजगी व सरकारी रुग्णालयांच्या सहाय्याने एकूण १२०९ उपचार व शस्त्रक्रियांवर रुग्णास मोफत सेवा देण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत कॅन्सर,हृदय रोग शस्त्रक्रिया (एन्जिओप्लास्टी,ओपन हार्ट सर्जरी), सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हिप आणि knee ज्यॉइंट रिप्लासिमेंट), मेंदू शस्त्रक्रिया, मूत्रविकार व त्यावरील शस्त्रक्रिया इत्यादी आजारांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत सामाजिक,आर्थिक व जातनिहाय जनगणना-२०११ यादी अनुसार लाभार्थी नागरिकांची निवड ही करण्यात आलेली आहे.

या यादी नुसार चंद्रपूर शहर विभागात एकूण १६,५२७ लाभार्थी कुटुंबांचा समावेश असून ७२,३९४ नागरीक या योजनेचे पात्र लाभार्थी असून आत्तापर्यंत एकूण १२,२०० लोकांना आयुष्मान कार्ड चे वितरण करण्यात आलेले आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थाजवळ ‘आयुष्मान कार्ड’ असणे गरजेचे आहे. आयुष्मान कार्ड काढण्याकरीता पात्र लाभार्थी नागरीकांजवळ आधार कार्ड, राशन कार्ड किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे पत्र असणे आवश्यक असून नजीकच्या सि.एस.सि.केंद्र/आपले सरकार केंद्र किंवा जिल्हातील योजनेंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालयामध्ये हे कार्ड मोफत बनवून मिळत आहे. चंद्रपूर शहर येथे योजनेंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालय सामान्य रुग्णालय,छोटा बाजार, मुसळे रुग्णालय,मानवतकर रुग्णालय,क्रिस्त रुग्णालय, गाडेगोणे रुग्णालय, डॉ.अजय वासाडे रुग्णालय येथे आयुष्मान कार्ड मोफत काढून देण्यात येत आहे.

मा.आयुक्त, मनपा चंद्रपूर शहर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सभेत चंद्रपूर शहर महानगरपालीकेच्या सर्व माजी नगर सेवक/ नगर सेविका उपस्थित होते. त्यांना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती देऊन नागरीकामंध्ये जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. सदर सभेला सर्व सि.एस.सि केंद्र/आपले सरकार केंद्र धारक सुद्धा उपस्थित होते. महानगरपालिकेच्या सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत आरोग्य विमा (ई-गोल्डन कार्ड ) काढण्याकरिता शहरात वेगवेगळ्या ठिकाणी शिबीर आयोजीत करण्याबाबतच्या सूचना सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.आयुक्त विपिन पालीवाल यांचा अध्यक्षतेत झालेल्या सभेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ.सुमित भगत तसेच शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

येथे काढता येईल आयुष्मान कार्ड

● आशा कॉम्पुटर इंदिरा नगर

● उमेश नक्षीने केंद्र इंदिरा नगर

● उमरे सिएससी केंद्र रामनगर

● श्री इंटरनेट केंद्र रामनगर

● आदित्य सर्विस केंद्र बालाजी वार्ड

● सचिन निंबाळकर बालाजी वार्ड

● युवराज पवार केंद्र बाबूपेठ वार्ड

● स्वप्नील वर्भे केंद्र बाबूपेठ वार्ड

● एम.के. सायबर कॅफे केंद्र बागड खिडकी

● ओम प्रकाश कुमरे केंद्र तुकूम

व इतर सीएससी केंद्रे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अनुसूचित जमातीची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करणार - मंत्री दीपक केसरकर

Sat Dec 24 , 2022
नागपूर : अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर रिक्त झालेल्या तीन हजार 898 जागांवरील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या पदांची भरती प्रक्रिया जुलै 2023 पर्यंत, तर गट ‘अ’ आणि ‘ब’ मधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितले. अनुसूचित जमाती संवर्गातील ज्या – ज्या कर्मचाऱ्यांनी वैधता प्रमाणपत्र सादर केले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com