मुंबई :- भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी प्रदेश भाजपा कार्यालयात भाजपाचे ज्येष्ठ नेते व उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल पद्म भूषण राम नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, सह सचिव भरत राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी राम नाईक म्हणाले की आज भारतीय जनता पार्टी इतकी मजबूत झाली आहे की ‘अब की बार 400 पार’ साठी सज्ज आहे. पूर्ण विश्वासाने महाराष्ट्रात 45 पार चा नारा आपण देत आहोत. नाईक यांनी यावेळी 1980 मध्ये पक्ष स्थापनेपासूनच्या स्मृतींना उजाळा दिला. उज्वल भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी स्थापन झालेल्या भाजपाच्या या यशस्वी वाटचालीत प्रमुख नेत्यांसोबतच सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचा संकल्प पूर्ण करून भारताला जगभरात सर्वश्रेष्ठ बनवायचे आहे असेही ते म्हणाले.
यावेळी पक्षाच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या कांताताई नलावडे, डॉ. जीवराज शाह, शैला पतंगे, शंकर खंडेलवाल, शिल्पा गणपत्ये, प्रकाश जैन, दिलीप गोडांबे, श्रीपाद मुसळे, मोहन बने,रतन गौलानी, मधू चव्हाण, अतुल शाह, रश्मी तन्ना आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.