– आयुक्त डॉ. चौधरी यांचा पुढाकार; अतिरिक्त आयुक्तांनी स्वतः केले दहन घाट स्वच्छ
नागपूर :- नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारताना शहरातील दहन घाटाची स्वच्छता देखील इतकीच महत्त्वाची आहे. याची जाणीव ठेवत स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियाना अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे पहिल्यांदाच सामूहिकरीत्या दहन घाटांची सखोल स्वच्छता करण्यात आली.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल व अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध दहन घाटांची स्वच्छता करण्यात आली. यंदाच्या दिवाळीत संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर साकारण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढकार घेत केंद्र शासनाच्या‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानाच्या माध्यमातून २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान शहरात विविध उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. या अंतर्गत शुक्रवारी (ता.२५) मनपाच्या दहाही झोनमधील २० दहन घाटांची स्वच्छता करण्यात आली.
यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी विविध दहनघाटाना भेट देत स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी स्वतः गंगाबाई दहन घाट परिसराची स्वच्छता केली. अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी हाती झाडू घेत परिसर स्वच्छ केला. तर अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी देखील मोक्षधाम घाटाची स्वच्छता केली.याशिवाय मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, मुख्य अभियंता लीना उपाध्ये यांच्यासह सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त यांनी देखील स्वच्छता अभियानात सक्रीय सहभाग नोंदविला.
मनपाच्या दहाही झोनचे सहायक आयुक्तांनी परिसरातील पालापाचोळा, झाडाच्या फांद्या आदी उचलून कचरा गाडीत टाकल्या. तसेच स्वच्छ करण्यात आलेला परिसर पुन्हा अस्वच्छ होवू नये, व नियमित स्वच्छता व्हावी याची दक्षता घेण्याचे सांगितले. यावेळी लक्ष्मीनगर झोनमधील जयताळा आणि सहकार नगर दहन घाट येथे मनपाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त मिलिंद मेश्राम, यांनी स्वच्छता केली. तर धरमपेठ झोनमधील अंबाझरी आणि फ्रेन्ड्स कॉलनी दहन घाट येथे उपायुक्त प्रकाश वराडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी स्वच्छता केली, हनुमान नगर झोनमधील मानेवाडा आणि नरसाळा दहन घाट येथे अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी स्वच्छता केले.
धंतोली झोनमधील मोक्षधाम आणि चिंचभवन दहन घाट येथे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, सहायक आयुक्त प्रमोद वानखेडे, कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर यांनी स्वच्छता केली. नेहरुनगर झोनमधील दिघोरी आणि वाठोडा दहन घाट येथे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी नरेंद्र बहिरवार, सहायक आयुक्त विकास रायबोले यांनी स्वच्छता केली. तर गांधीबाग झोनमधील गंगाबाई दहन घाट, येथे अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहायक आयुक्त गणेश राठोड यांनी स्वच्छता करीत परिसर स्वच्छ साकारला.
सतरंजीपुरा झोनमधील शांतीनगर दहन घाट येथे सहायक आयुक्त घनशाम पंधरे,कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे यांनी स्वच्छता केली. लकडगंज झोनमधील पारडी, भरतवाडा, कळमना आणि पुनापूर दहन घाटावर मुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे, सहायक आयुक्त विजय थूल, श्याम कापसे,कार्यकारी अभियंता अजय डहाके यांनी स्वच्छता केले. आशीनगर झोनमधील वैशाली नगर आणि नारी दहन घाट येथे मुख्य अभियंता लीना उपाध्ये, सहायक आयुक्त हरीश राऊत, उप अभियंता राजेश दुफारे यांनी स्वच्छता केली. तर मंगळवारी झोनमधील मानकापूर दहन घाट येथे उपायुक्त डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त अशोक घरोटे, कार्यकारी अभियंता कमलेश चव्हाण यांनी स्वच्छता केली. यावेळी संबधित झोनल अधिकारी सर्वश्री रामभाऊ तिडके, दीनदयाळ टेंभेकर, दिनेश कलोडे, विठोबा रामटेके, सुरेश खरे, राजीव राजूरकर, प्रमोद आत्राम, सुनील तांबे, भूषण गजभिये यांच्यासह मनपाचे स्वच्छता दूत प्रामुख्याने उपस्थित होते.