न्यू दिल्ली – देशात गेल्या काही दिवसात इंधनाचे दर वाढल्याने सामान्य नागरिक त्रस्त आहेत. अश्यात पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनं आणि फ्लेक्स इंधानावर आधारित इंजिनावर भर दिला जात आहे. आता वाहन निर्मिती कंपन्याना फ्लेक्स इंधन इंजिन अनिवार्य करण्यासंबधी धोरणावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या दोन दिवसात या संबंधित फाईलवर स्वाक्षरी केली जाईल, असं सांगितलं आहे. फ्लेक्स इंजिनात एकापेक्षा जास्त इंधनाचा वापर करता येऊ शकतो. फ्लेक्स इंधन पेट्रोल आणि मिथेनॉल किंवा इथेनॉलच्या मिश्रणातून तयार करण्यात येते. भारतात पेट्रोलमध्ये ८.५ टक्के इथेनॉलचा वापर होतो. येत्या दोन वर्षात हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत येणार आहे. त्यामुळे फ्लेक्स इंजिनाची निर्मिती करणं आवश्यक आहे.
“भारतात दरवर्षी ८ लाख कोटी रुपयांची पेट्रोलियम उत्पादनं आयात करतो. जर देश असाच इंधनावर अवलंबून राहिला तर पुढच्या पाच वर्षात आयातीचं बिल २५ लाख रुपयांपर्यंत वाढेल. इंधनाची आयात कमी करण्यासाठी दोन ते तीन दिवसात एका फाईलवर स्वाक्षरी करणार आहे. कंपन्यांना फ्लेक्स इंधन इंजिनाची निर्मिती करण्यास सांगितलं जाणार आहे.”, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. टोयोटा मोटर कॉर्पोरेशन, सुझुकी आणि ह्युंदई मोटर इंडियाच्या उच्च अधिकाऱ्यांनी याबाबतचं आश्वासन दिल्याचंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढे सांगितलं.