‘आपली बस’च्या ताफ्यात आणखी २५० ई-बस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

‘ही’ नव्या युगाची सुरूवात : ना. नितीन गडकरींकडून गौरवोद्गार

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ सेवेच्या ताफ्यात आणखी २५० बसचा समावेश होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधी घोषणा केली. तर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी पर्यावरणपूरक वातानुकूलित बस सेवा ही नागपूर शहरातील नव्या युगाची सुरूवात असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय परिवहन, महामार्ग विभाग मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.

नागपूर स्मार्ट सिटीद्वारे मनपाला प्रदान करण्यात आलेल्या वातानुकूलीत विद्युत बसेसचे लोकार्पण केंद्रीय परिवहन, महामार्ग विभाग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत रविवारी (ता.१९) पार पडले. संविधान चौकात झालेल्या लोकार्पण समारंभात विशेष अतिथी म्हणून आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, माजी परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, हंसा ट्रॅव्हल्स आदित्य छाजेड, टाटा मोटर्सचे भूवन सिल्हारे, सतीश श्रीगुप्पी, सॅम्युअल डॅनडिन, हारून पठाण, प्रशांत कुमार, अमोल तालेकर, जायका मोटर्सचे कुमार काळे, प्रवीण खेडिकर आदी उपस्थित होते.

यावेळी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या विद्युत बसेसची संख्या वाढविण्याच्या संकल्पनेचे समर्थन केले. त्यांनी २५० विद्युत बसेस खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली व या बसेस तात्काळ घेण्याचेही सूचित केले. याशिवाय शहरात अद्ययावत परिवहन सेवा निर्माण व्हावी यादृष्टीने कार्यवाही करण्याची त्यांनी सूचना केली. मेट्रोप्रमाणेच ‘आपली बस’ कुठल्या बस स्थानकावर किती वेळेत पोहोचणार याची माहिती देणारे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे त्यांनी सूचित केले. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून परिवहन सेवा चालविल्यास त्याला आणखी जास्त प्रतिसाद मिळेल, असेही उप मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहरात पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेसाठी नागपूर स्मार्ट सिटीने घेतलेल्या पुढाकाराबद्दल स्मार्ट सिटी आणि मनपाचे अभिनंदन केले. त्यांनी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये चढण्या-उतरण्यास सोयीस्कर बसचा समावेश करण्याची सूचना केली. याशिवाय पूर्णत: ई-तिकीटवर आधारित परिवहन सेवा करणे तसेच मेट्रो व ‘आपली बस’ची तिकीट एकाच कार्डवरून काढली जाईल, असे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे सूचित केले. भारत सरकारच्या ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ नुसार १५ वर्ष जुनी मनपातील सर्व वाहने ‘स्क्रॅपिंग’मध्ये काढण्याचे त्यांनी निर्देशित केले. जेवढे जास्त ‘स्क्रॅपिंग’ होईल. तेवढे पर्यावरणाचे संरक्षण करता येईल व नवीन पर्यावरणपूरक वाहनांचा समावेश सुद्धा करून घेता येईल, असेही ते म्हणाले. नागपूर शहर प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने विद्युत बस हे उत्तम पाउल आहे. नागपूर शहरासाठी राज्याचे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी १ हजार कोटी लॉजिस्टिक हब साठी दिले आहेत. लॉजिस्टिक हबच्या माध्यमातून नागपूर शहर स्वच्छ, सुदंर व प्रदूषणमुक्त होण्याकरिता फायदा होईल, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

प्रास्ताविकामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी अद्ययावत तंत्रानावर आधारित पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेमुळे शहरातील नागरिकांचा प्रवास आरामदायी होईल, अशी अशा व्यक्त केली. उन्हाळा सुरू होत असताना मनपाद्वारे वातानुकूलित पर्यावरणपूरक विद्युत बसेसचे लोकार्पण होणे ही महत्वाची बाब असल्याचे नमूद केले. नागपूर स्मार्ट सिटीकडून प्राप्त ४० विद्युत बसेस पाठोपाठ जून पर्यंत आणखी १४४ विद्युत बसेस प्राप्त होणार आहेत. याशिवाय मोरभवन, हिंगणा आणि वाठोडा डेपोला अद्ययावत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणरपूरक अद्ययावत वातानुकूलित वाहतूक व्यवस्था, अपडेटेट डेपो हे सर्व साकारताना ‘आपली बस’च्या तिकीट दरात कुठलिही वाढ केली नाही, प्रवाशांचा खिशाला ओझे दिले नसल्याचेही आयुक्तांनी नमूद केले. त्यांन शहरात जास्तीत जास्त विद्युत बसेसचे संचालन केल्यास मनपाचा तोटा कमी होउन फायदा होईल व त्यासंबंधी प्रस्ताव देण्यास असल्याचे सांगितले. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तांच्या मागणीवरून २५० बसेससाठी निधीची घोषणा केली.

कार्यक्रमाचे संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले तर आभार नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

द.पू.म.रेल की डीआरएम नमिता त्रिपाठी ने सिवनी रेलवे स्टेशन का किया निरीक्षण   

Mon Mar 20 , 2023
ब्राॅडगेज लाईन स्टेशन मे खामियों को ठीक करने के दिए निर्देश  नागपूर :- रविवार को दक्षिण पूर्व मध्य रेल के नागपुर डिवीजन की नवनियुक्त डीआरएम नमिता त्रिपाठी सिवनी रेलवे स्टेशन की जांच के लिए पहुंची। निरीक्षण में उन्होंने सिवनी रेलवे स्टेशन में हुए निर्माण में कुछ खामियां देखी जिसे दुरुस्त करने के लिए तत्काल निर्देश दिए। रेलवे स्टेशन में यात्रियों […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com