– कोलारी (साठगाव) गावावर शोककळा : जनक बुडाला आणि अन्य चौघेही गेले
नागभीड (चंद्रपूर) :- नागभीडच्या शिवटेकडीवर जातो, असे सांगून घोडाझरी तलावावर गेलेल्या पाच युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. पाचही मृतक चिमूर तालुक्यातील कोलारी (साठगाव) येथील रहिवासी आहेत. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. धुळवड आनंदात साजरी झाली असताना दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या घटनेने कोलारी गाव शोकसागरात बुडाले आहे.
जनक किशोर गावंडे (२५), यश किशोर गावंडे (२२), अनिकेत वामन गावंडे (२८), तेजस बाळाजी गावंडे (२४) आणि तेजस संजय ठाकरे (१७) अशी मृतकांची नावे आहेत. तर सुदैवाने आर्यन हेमाजी इंगोले (१८) या दुर्दैवी घटनेतून बचावला,
जनक हा भंडारा जिल्ह्यातील वरठी वेथील सनफ्लॅग कंपनीत नोकरीला आहे. त्याला धुळवडीची सुटी मिळाली नाही म्हणून तो शनिवारी सकाळी कोलारी या स्वगावी आला. या सर्व मित्रांनी बाहेर जाण्याचा बेत आखला. घरी नागभीड येथील शिवटेकडीवर जातो, असे सांगितले. मात्र ते सरळ घोडाझरी तलावावर पोहोचले. तलावावर पोहोचल्यानंतर त्यांनी पोहण्याचे ठरविले. अगोदर जनक पाण्यात उतरला. तेथे मोठमाठे खड्डे पडलेले आहेत. मागोमाग इतर पाचही युवक पाण्यात उतरले. जनकला खड्यांचा अंदाज न आल्याने तो सरळ खड्ड्यातील पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी इतर पाचही युवक धावले. मात्र जनकसोबत तेही बुडाले. यातून आर्यन कसा तरी बाहेर निघाला. आर्यनने घटनेची माहिती आजूबाजूच्या लोकांना दिली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून लगेच व्हायरल झाली. माहिती होताच ठाणेदार रमाकांत कोकाटे व नायब तहसीलदार उमेश कावळे लगेच घटनास्थळी दाखल झाले. तिथे हजर असलेल्या नावाङधांच्या मदतीने बुडालेल्या युतकांचा शोध घेतला असता पाच वाजता सर्व पाचही जणांचे मृतदेहच हाती लागले.
मोठ्या प्रमाणात उत्खनन…
ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी तीन-चार गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात आले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आले. त्यामुळे तेथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे नसते तर कदाचित या पाचही युवकांचे प्राण वाचले असते.
पाच युवक याआधी बुडाले होते…
१६ जुलै २०२३ रोजी घोडाझरी तलावात बुडून ४ युवकांचा मृत्यू झाला होता. यात मनीष श्रीरामे (२६), धीरज झाडे (२७), संकेत मोडक (२५), चेतन मांदाडे (१७) यांचा समावेश होता. हे युवक वरोरा तालुक्यातील शेगाव येथील रहिवासी होते. शनिवारच्या या घटनेने १६ जुलै २०२३ च्या घटनेच्या कटू स्मृती जाग्या झाल्या.