– 17 आणि 18 ऑगस्ट रोजी पारंपरिक औषधांवरील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला जाणार
नवी दिल्ली :- आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी 17 आणि 18 ऑगस्ट 2023 रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे पारंपारिक औषधांवरील दोन दिवसीय शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथे पारंपारिक औषधांवरील पहिल्या जागतिक शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांना माहिती दिली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल यांनीही माध्यमांना संबोधित केले.
जागतिक आरोग्य संघटनेने गुजरातमधील जामनगर येथे स्थापन केलेले पारंपारिक औषधांवरील जागतिक केंद्र हे विकसनशील देशातील अशा प्रकारचे पहिले केंद्र असलयाचे केंद्रीय आयुष सचिवांनी अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की 17 आणि 18 ऑगस्ट 2023 रोजी गांधीनगर येथे जागतिक आरोग्य संघटनेने आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने पारंपारिक औषधांवरील जागतिक शिखर परिषदेचे आयोजन केले असून यामध्ये आरोग्यविषयक गंभीर आव्हानांना सामोरे जाण्यात तसेच जागतिक आरोग्य आणि शाश्वत विकासामध्ये प्रगतीला चालना देण्यात पारंपारिक, पूरक आणि एकात्मिक औषध प्रणालीच्या भूमिकेची चाचपणी केली जाईल.
माध्यमांना संबोधित करताना वैद्य कोटेचा म्हणाले, “पारंपारिक औषध क्षेत्रात भारताचे नेतृत्व दाखविण्याची जी 20 ही एक अनोखी संधी आहे. गेल्या 9 वर्षांत भारताने पारंपरिक औषध क्षेत्रात आठ पटीने प्रगती केली आहे. चालू वर्षाच्या अखेरीस, देशभरात 12,500 हून अधिक आयुष-आधारित आरोग्य आणि निरामयता केंद्रे कार्यरत होतील, त्यापैकी 8,500 यापूर्वीच सुरू झाली आहेत.”
या दोन दिवसीय कार्यक्रमाला 30 देशांचे आरोग्य मंत्री उपस्थित राहणार आहेत. 90 हून अधिक देशांमधील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर सदस्य, सरकारी प्रतिनिधी आणि पारंपारिक औषध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कंपन्या यांना एकत्र आणणारा हा अशा प्रकारचा सर्वात मोठा मेळावा असेल.