– संख्या वाढविण्यास संघटनेचा विरोध
– बैठकीत निर्णय
नागपूर :- आधीच कुलींची संख्या जास्त, त्यात बॅटरी कार आणि ट्रॉली बॅग आल्यामुळे कुलींच्या हाताला पाहिजे तसे काम मिळत नाही. वाढत्या तांत्रिक साधनांमुळे रोजीही नाही. अनेकदा रिकाम्या हातांनी घरी परतावे लागते. कुलींवरील आर्थिक संकट वाढत असून, उपासमारीची वेळ आली आहे. अशा विपरीत परिस्थितीत नागपूर विभागात 40, तर नागपुरात 5 कुलींची संख्या वाढविण्यात येणार आहे. या नवीन भरतीचा मध्य रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल मजिद यांनी विरोध केला आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावर सध्या कुलींची संख्या 150 आहे. दोन पाळ्यांमध्ये कुली काम करतात. मात्र, बॅटरी कार आणि ट्रॉली बॅग वाढल्याने कुलींच्या हातांना काम उरलेले नाही. बहुतांश प्रवासी ट्रॉली बॅग ओढत फलाटापर्यंत जातात. वयोवृद्ध आणि रुग्णांसाठी बॅटरी कार आहे. धडधाकट आणि युवक, युवतीही बॅटरी कारचा वापर करतात. सोबत सामान घेऊन जातात. अशा स्थितीत कुलींना कोणी विचारत नाही. रिकाम्या हातांनी कुलींना घरी परतावे लागते. अशा विपरीत स्थितीत कुलींची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात विरोध होत आहे. भविष्यात कुलींचे जगणे कठीण होणार आहे. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आणि पुढील योजना आखण्यासाठी कुलींनी एक बैठक घेतली. या बैठकीला अजय पाल, कुणाल गौरखेडे, सोनू गायकवाड, नितीन बारमाटे, अजीज मोहम्मद, मनोज वासनिक आदी उपस्थित होते.
कामबंद आंदोलनाचा इशारा
आधीच कुलींची संख्या अधिक त्यात तांत्रिक साधने वाढल्याने कुलींच्या हातांना काम उरलेले नाही. कुलींची संख्या वाढविल्यास सध्या कार्यरत कुलींना उपाशी राहण्याची वेळ येईल. रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले. निर्णय मागे न घेतल्यास कामबंद आंदोलन करू
अब्दुल मजिद, अध्यक्ष, मध्य रेल्वे भारवाहक संघ