पाचही व्याघ्र संवर्धन प्रकल्पांचा तयार होणार एकत्रित पर्यटन आराखडा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

· वनामृत होणार आता वन विभागाचा ब्रॅण्ड

· एकिकृत “वंदे मातरम वनसेवा केंद्रां”ची निर्मिती करणार

मुंबई :- राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रकल्प हे आपले वैभव आहे. हे वैभव जगापुढे येणे आणि पर्यटकांना त्याठिकाणी आकर्षित करण्यासाठी या सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या सोयीसुविधांमध्ये एकसूत्रता आणणे गरजेचे आहे. त्यासाठी पाचही व्याघ्र प्रकल्पांचा एकत्रित पर्यटन आराखडा तयार करावा, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्याचप्रमाणे वन विभागामार्फत उत्पादित वस्तूंसाठी यापुढे “वनामृत” हा एकच ब्रँड वापरण्याचा निर्णयही मुनगंटीवार यांनी जाहीर केला.

राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार झाली. त्यावेळी ते बोलत होते. वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर आणि महिप गुप्ता यांच्यासह ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच-बोर व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, आणि नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री वन मुनगंटीवार म्हणाले की, पाचही व्याघ्र प्रकल्पाचा पाच वर्षासाठी एकत्रित पर्यटन आराखडा तयार करण्यात यावा. एखाद्या व्याघ्र प्रकल्पात अभिनव उपक्रम राबविले गेले असतील तर त्याची इतर ठिकाणी अंमलबजावणी करता येईल का, याचा विचार व्हावा. व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण त्याठिकाणी राहील, हे पाहावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा, सेल्फी पॉईंटसची निर्मिती करावी. तेथील परिसरातील गावातील घरांच्या भिंतीवर वन्यजीव आणि पर्यावरणपूरक चित्रे रंगवून अधिकाधिक वातावरण निर्मिती करावी. स्थानिक नागरिकांना रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, येथील महिला- युवक यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळेल, यासाठी प्रयत्न करणे, व्याघ्र प्रकल्पाद्वारे निर्मित वस्तू्ंचे योग्य ब्रॅंडिंग होईल, त्यामध्ये एकसमानता असेल, याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.

या प्रकल्पातील बांबू झाडांच्या फुलोऱ्याचे व्यवस्थापन करणे, बीज साठवण, अग्नी संरक्षण या बाबींकडे अधिक गंभीरतेने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सांगून  मुनगंटीवार म्हणाले की, प्रत्येक व्याघ्र प्रकल्पाने त्यांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी क्यूआर कोड तयार करावा. ज्याठिकाणी नदी, तलाव आहेत, तेथे हाऊसबोट सारखी संकल्पना राबवावी.

पाचही व्याघ्र संवर्धन प्रकल्पात वंदे मातरम वनसेवा केंद्र सुरु करण्यात यावे. ज्याप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्रांवर राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळते, त्याप्रमाणे वन विभागाच्या योजनांची माहिती आणि सेवा या केंद्रातून सुरु करण्याचे निर्देशही मंत्री मुनगंटीवार यांनी दिले. विविध व्याघ्र प्रकल्पात अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. ते त्याच प्रकल्पापुरते मर्यादीत न राहता त्याची अंमलबजावणी इतरही प्रकल्पात करण्यात यावी, यासाठी एक समिती नेमून त्याआधारे अभ्यास करुन एका महिन्यात त्यासंबंधी कार्य अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सध्या सर्व व्याघ्र प्रकल्पांना त्यांच्या कामाबद्दल केंद्रीय यंत्रणेने अधिक चांगला शेरा दिला आहे. हा शेरा कायम उत्कृष्ट राहील, यासाठी सर्वांनी काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

‘वनामृत’ हा होणार आता वन विभागाचा ब्रॅण्ड

वन विभागामार्फत उत्पादित वस्तूंची आता वनामृत या एकाच ब्रॅण्डनेमद्वारे प्रसिद्धी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्याअनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी. विविध व्याघ्र प्रकल्पात वस्तू / उत्पादन निर्मित होत असले तरी ते जगभर एकाच नावाने ओळखले जावे, यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी केली.

यावेळी व्याघ्र प्रकल्पांच्या सर्व क्षेत्रसंचालकांनी सादरीकरण करुन त्याठिकाणी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आहार पुरवठा संनियंत्रण प्रणालीचे उदघाटन

Thu Jan 25 , 2024
मुंबई :- केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 0 ते 6 महिने वयोगटातील मुले, गरोदर व स्तनदा माता यांना घरपोच आहार देण्यात येतो. विभागामार्फत आहार पुरवठा संनियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आली असून या प्रणालीचे उद्धाटन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री तटकरे यांच्या हस्ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com