कोदामेंढी :- येथे मागच्या गुरुवारला 26 सप्टेंबरला झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शाळेतील प्रांगणाला गुरुवार ते सोमवार पर्यंत तलावाचे स्वरूप आलेले होते. याबाबत विविध मराठी व हिंदी दैनिकातून बातम्याही प्रकाशित करण्यात आल्या होत्या. याबाबत मंगळवार एक ऑक्टोबरला या शाळेचे व्यवस्थापन समिती सदस्य तथा ग्रामपंचायतचे उच्चशिक्षित ग्रामपंचायत सदस्य विष्णू बावनकुळे हे गावातील श्रीराम भक्त हनुमान मंदिराजवळ भेटले असता त्यांनी सांगितले की, जनतेतून निवडून आलेले सरपंच आशिष बावनकुळे गावात मुक्कामी राहत नसल्याने त्यांना भ्रमणध्वनीवरून शाळेतील समस्या दोन दिवसापूर्वी सांगितली असता ,त्यांनी जेसीपी पाठवतो म्हणाले ,परंतु दोन दिवसापासून जेसीपी न आल्याने येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना बोलावून त्यांच्याकडून तात्पुरती नाली करून शाळेतील पाणी काढल्याचे त्यांनी सांगितले.
सरपंच गावात राहत नसल्याने शाळेतील समस्यांसह गावातील इतरही समस्या ग्रामपंचायत मध्ये करोडोंच्या निधी उपलब्ध असूनही , त्या सोडविण्यासाठी विलंब होत आहे .एवढेच नव्हे तर सरपंच कडे व ग्रामपंचायत कार्यालयात चकरा मारणे बंद करण्यासाठी समस्याग्रस्त नागरिकांना ग्रामपंचायतकडे एकही रुपया नसल्याचे खोटे सांगण्यात येत आहे व त्यांच्याकडूनच कामे करण्यासाठी निधीची मागणी करण्यात येत आहे.
आता शासनाच्या जीआर नुसार येथील सरपंचांना 4000 ऐवजी 8000 रुपये म्हणजे दुप्पट मानधन मिळणार आहे, मुख्यालयी मुक्कामी न राहणाऱ्या सरपंचांना त्यांचे मानधन दुप्पट करण्याऐवजी जे मिळत आहे त्याचे अर्धे करण्याच्या जीआर काढून अशा सरपंचांना शासनाने धडा शिक वावे किंवा अशा मुक्कामी न राहणाऱ्या सरपंचांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ पदमुक्त करून त्यांच्या ऐवजी गावातील मुक्कामी राहणाऱ्या सरपंचाची निवड करावी, अशी मागणी गावातील समस्याग्रस्त त्रस्त नागरिकांनी शासनाकडे केली आहे.