नागपूर :- सुरेशभट सभागृह नागपूर येथे ९ मार्च रोजी घरगुती भांडी वाटप कार्यक्रम लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप तर्फे आयोजित करण्यात आला होता. मोफत भांडी वाटप कार्यक्रम ८ मार्च जागतिक महिला दिनापासून ११ मार्च पर्यंत असा चार दिवसाचा कार्यक्रम ठरवण्यात आला होता. महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळ या नावाखाली इमारत बांधकाम कामगार व घरेलू कामगार नोंदणी व नूतनीकरण कार्यक्रम आयोजित करून हजारोच्या संख्येने महिलांना एकत्रितपणे भट सभागृह रेशीमबाग येथे मोफत भांडी वाटप करण्यात येणार असे आमिष दाखवून बोलवण्यात आले होते. वरील कार्यक्रमाला भाजपातील मातब्बर नेते येणार अशी माहिती नागरिकां मधील चर्चेतून समजली. मिळणारी घरगुती भांडी ही अंदाजे १५ हजार रुपये किमतीची आहेत असे दर्शवण्यात आले होते. परंतु ढिसाळ व्यवस्थेमुळे अचानक गोंधळ होऊन एका महिलेला आपला जीव गमवावा लागला तसेच कित्येक महिला गंभीर जखमी होऊन रुग्णालयात उपचार घेत आहेत. मृतक महिला एकापेक्षा अधिक आहेत असे बोलल्या जात असून जखमीचा आकडा सुद्धा मोठा असून तो आकडा सांगण्यास नकार देण्यात येत आहे. मृतक महिलांच्या परिवाराला १० लाख रुपये आर्थिक मदत देऊन परिवारातील एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी. तसेच गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या महिलांच्या परिवाराला ५ लाख रुपये सानुग्रह राशी देण्यात यावी. अशी मागणी सी आय टी यु चे राज्य कौन्सिल सदस्य कॉम्रेड राजेंद्र साठे यांनी एका पत्रकार द्वारे केली.
वरील कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा होता. त्या कार्यक्रमात शासकीय कर्मचारी व अधिकारी सुद्धा उपस्थित होते असे कळते. राजनीतिक पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा योगदान असणे कितपत योग्य आहे. त्यामुळे जे असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे अपेक्षित असून भारतीय जनता पक्षाचे राज्य अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विद्यमान खासदार तसेच केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सह आयोजकांवर सुद्धा कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. निवडणुकीच्या तोंडावर जनतेला आमिष दाखवून मताचे राजकारण करणे हे योग्य नाही. सध्या स्थितीमध्ये सरकारचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, शालेय पोषण कामगार तसेच विविध क्षेत्रातील कामगार वाढत्या महागाई मध्ये त्रस्त झाले असून आपले अधिकार मिळवण्याकरिता संघर्ष करत असताना उपजीविका चालवणे त्यांना कठीण होऊन बसलेले आहे. त्यामुळे त्यांना किमान वेतन देण्यापेक्षा निवडणुकीच्या तोंडावर मोफत भांडी वाटप करणे, मोफत अन्नधान्य वाटप करणे किंवा फक्त शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा नावाने वाटप करून आपले फोटो प्रिंट करून मोठमोठ्या उद्योगपत्यांना फायदा पोहोचवण्याचे काम हे भाजपा प्रणित शासन करीत आहे. त्यामुळे सीबीआय चौकशी करून दोषीवर कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर वरील भांडी वाटप कार्यक्रम करण्याकरता एवढा मोठा निधी कोणी पुरवला व तो निधी कुठून आला याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे.