– शिवसैनिकांनी केला डीआरएम कार्यालयाला घेराव
– उग्र आंदोलन करण्याचा ईशारा
नागपूर :- मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकावरील सफाई कामगारांकडून वसुली करणार्या विरूध्द गुन्हे नोंदवा या मागणीसाठी शिवसेनेचे (उद्भव बालासाहब ठाकरे) शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालय (डीआरएम) चा घेराव करण्यात आला. यावेळी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त मनोज कुमार यांना निवेदन दिले.
कधी काळी रेल्वे स्थानकाची सफाई रेल्वे कर्मचार्यांकडूनच केली जायची. खाजगीकरणानंतर सफाईचे कंत्राट देण्यात आले. सध्या सफाईचे कंत्राट लखनउच्या एका कंपनीकडे आहे. नागपूरचा कारभार पाहण्यासाठी कंपनीने स्वतचा एक व्यक्ती ठेवला आहे. मात्र, त्याच्याकडे कामाचा व्याप जास्त असल्याने तो नागपुरात फार वेळ थांबत नाही. त्यामुळे त्याने स्थानिक व्यक्तीची व्यवस्थापकपदी नियुक्ती केली. या कंपनीत जवळपास 80 कामगार सफाईचे काम करतात. कामगार कायद्यानुसार त्यांना पगार मिळायला पाहिजे आणि मिळते सुध्दा. अर्थात कामगारांच्या बँक खात्यात नियमानुसार वेतन जमा केल्या जाते. मात्र, स्थानिक व्यवस्थापक त्यांच्याकडून दर महिण्याला चार ते पाच हजार रुपये वसूली करतो, असा आरोप नितीन तिवारी यांनी केला. शिवाय त्याचे पुरावे सुध्दा वाणिज्य व्यवस्थापकांना दिले. मागील चार वर्षांपासून कामगारांची अशा पध्दतीने पिळवणूक केली जात आहे. ज्याने पैसे दिले नाही, त्याला कामावरून काढून देण्याची धमकी सुध्दा दिली जाते, कामगारांनी पिळवणुकीची तक्रार हेल्थ निरीक्षक यांच्याकडे केली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही, असे निवेदनात म्हटले आहे. कामगारांची पिळवणूक करण्यात अनेकांचा सहभागी असल्याचा आरोप करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापका विरूध्द गुन्हा नोंदविण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा दिला. या प्रसंगी मुन्ना तिवारी, कार्तिक करोसिया, भूपेन्द्र कढ़ाने, आशीष हाड़गे, राम कुकड़े, जोसफ़ राव, ललित बावनकर, विक्की मिश्रा, अक्षय दीक्षित, निहाल रंगारी यांच्यासह शेकडो सफाई कामगार आणि शिवसैनिक उपस्थित होते.