लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. या टप्प्यात सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील एकूण ४९ जागांसाठी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे या टप्पात राहुल गांधी, स्मृती इराणी, ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यापैकी अमेठी आणि रायबरेलीच्या जागावर विशेष लक्ष असणार आहे.
अमेठी आणि रायबरेलीत सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी सकाळपासून मतदारांच्या रांगा बघायला मिळत आहेत. अमेठीत भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी यांची लढत काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा यांच्याशी आहे. तर रायबरेलीत काँग्रेसने राहुल गांधी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपाने दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे. बसपाचे ठाकूर प्रसाद यादव देखील रिंगणात आहेत.
रायबरेलीत एकूण १७ लाख ८३ हजार ५७१ मतदार असून यापैकी ८ लाख ५२ हजार ५५२ महिला मतदान आहेत. रायबरेलीत १२३६ मतदान केंद्रावर निवडणूक पार पडत आहे. यापैकी काही मतदानकेंद्र संवेदनशील आहेत. या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधीदेखील आज रायबरेली पोहोचण्याची शक्यता आहे.
याशिवाय अमेठी एकूण १७ लाख ९६ हजार ०९८ मतदार आहेत. यापैकी ९ लाख ४२ हजार ५३६ पुरुष तर ८ लाख ५३ हजार ४७८ महिला मतदार आहेत. यासाठी अमेठीत एकूण ११२५ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.
आज पाचव्या टप्प्यात अमेठी आणि रायबरेलीसह देशभरातील ४९ जागांवर मतदान पार पडत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १३, उत्तर प्रदेशातील १४, पश्चिम बंगालमधील ७, बिहारमधील ५ झारखंडमधील, ३, ओडिशामधील ५ आणि जम्मू काश्मीर आणि लदाखमधील प्रत्येकी १ जागेचा समावेश आहे.