– दोघांचे पाय तुटुन गंभीर जखमी
रामटेक :- शेतकामाकरिता महिला घेऊन जाणाऱ्या बोलेरो वाहनाने दुचाकीला समोरून धडक दिल्याने दुचाकी चालकाचा व सोबत बसलेल्या व्यक्तीचा उजवा पाय तुटून गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.18 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार,बोरडा येथील रहिवासी संजय डडमल वय 35 वर्ष, व आनंदराव घरत वय 40 वर्ष. हे दोघेही दुचाकी MH 40 AJ 1916 क्रमांकाच्या वाहनाने सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास रामटेक येथे जात होते. बोरडा खुमारी बायपास मार्गाने जात असतांना खुमारी कडून भरधाव वेगाने व आवश्यकतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन येणाऱ्या बोलेरो क्रमांक MH 31 CS 9499 या वाहनाने दुचाकीला समोरून धडक दिली.
बोलेरो चालकाचा वाहनावरून नियंत्रण सुटल्याने बोलेरो वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या बोलेरो वाहनात जवळपास 20 ते 22 महिलांचा समावेश असल्याची माहिती त्यावेळी ग्रामस्थांनी दिली.
या अपघातात दुचाकी चालक व सोबत असलेले व्यक्ती हे गंभीर जखमी झाले असून पाय तुटल्याचे वृत्त आहे. बोलेरो वाहनातील 3 महिलांना किरकोळ मार लागल्याने यांना नागपूर मेडिकल येथे पाठविण्यात आले आहे.
घटनेची माहिती तात्काळ खुमारी टोल प्लाझा यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींना मेडिकल कॉलेज नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. सद्या जिकडेतिकडे शेतीचे कामे सुरू आहेत.ग्रामीण भागात धान कापणीसाठी महिलांची आवश्यकता भासत असल्याने अनेक ठिकाणी देवलापार परिसरातील आदिवासी महिलांना शेतकामासाठी आयात केले जातात. वाहनचालक देखील आवश्यकतेपेक्षा जास्त महिलांना वाहनात प्रवेश देत असतात. यामुळेच असे अपघात घडुन येतात. आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात प्रवासी वाहून नेणाऱ्या वाहनांकडे पोलिसांचे देखील लक्ष नसल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असून वळणावरून वाहन येत असताना दिसत नसल्याने हा अपघात झाला असावा असे दर्शकांचे सांगणे आहे.