Ø जिल्हा कृषी महोत्सवास प्रारंभ
Ø शेतकऱ्यांच्या उपन्नवाढीसाठी सहाय्यभूत
Ø 200 विविध स्टॉलचे प्रदर्शन
Ø आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घ्या
नागपूर :- नवीन आधूनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करुन त्यांच्या उत्पादनात वाढ करण्याचे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रयत्न स्तुत्य असून शेतकऱ्याच्या हितावह आहे. यासोबतच केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या एकात्मिक शेती प्रकल्पाला शेतकऱ्यांनी भेट देवून शेती उत्पनात वाढ करावी, असा सल्ला केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे संचालक वाय. जी. प्रसाद यांनी शेतकऱ्यांना दिला.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पद्व्युत्तर वसतिगृह परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाच्या उदघाटनपर भाषणात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. प्रमुख पाहूणे म्हापसू विद्यापीठाचे संचालक (विस्तार शिक्षण) ए.यु. भिकाने, तर अध्यक्षस्थानी कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे होते. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ प्रकाश कडू, एबीएम कॉलेजचे प्रा. विजय खवले, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. नलिनी भोयर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
एकात्मिक शेती प्रकल्पास शेतकऱ्यांनी भेट देवून तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी. त्याचा उपयोग शेती उत्पादनासाठी घ्यावा. त्याबरोबर केंद्राच्या बकरी फार्मला भेट देवून शेतीपूरक व्यवसाय करावा, असे प्रसाद यांनी सांगितले. युवकांनी प्रशिक्षण घेवून आधूनिक शेतीकडे वळावे. संस्थेतर्फे दरवर्षी 200 व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येत असून अनुसूचित जाती व जमाती यांना प्राधान्य देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व शेळी पालन व रेशिम उद्योगासारख्या शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे,असे आवाहनही त्यांनी केले.
कोरोना कालखंडानंतर प्रथमच आयोजित कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यामुळे आत्माच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळेल, असे म्हापसूचे संचालक ए.यु. भिकाने यांनी सांगितले. आधुनिक शेती व पशुसंवर्धनाच्या योजनांची माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. आधूनिक तंत्रज्ञानाच्या वापराने विदर्भातील शेती विकसित होईल व त्यांना बाजारमुल्य मिळेल. शाश्वत शेतीसाठी बाजारपेठ व विपणन व्यवस्था महत्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.
ब्रँडींग करुन शेतमाल विकल्यास उत्पन्न वाढीला मोठा वाव आहे. शेणखत विक्रीतून उत्पन्न निमिती होईल. शेताचे मुल्यवर्धन होणे आवश्यक आहे. सशक्त शेतीसाठी जनावराशिवाय पर्याय नाही म्हणून पशुसवंर्धनाकडे वळा, असा सल्ला त्यांनी दिला. दुधाचे उत्पादन कमी खर्चात कसे होईल, यावर भर दया. शाश्वत गोटा योजनेचा लाभ घ्या. जनावरांसाठी मुरघास तयार करा. त्यामुळे अर्थाजन मिळेल. आधूनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, डॉ. प्रकाश कडू यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नलिनी भोयर यांनी केले तर संचालन शिवनकर यांनी केले. उपस्थितांचे आभार मिलींद शेंडे यांनी मानले.
प्रारंभी मान्यवराच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. या महोत्सवात विविध विभाग व खाजगी असे 200 स्टॉल लावण्यात आले आहेत. या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक गटाचे प्रतिनिधी, शेतकरी गटाचे महिला शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.